लायकाच्या प्रवासाची 60 वर्षे; अंतराळात जाणारा पहिला प्राणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 04:06 PM2017-11-04T16:06:35+5:302017-11-04T16:21:24+5:30
अंतराळामध्ये जाणारा पहिला जिवंत प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लायकाला अंतराळात पाठवून 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. अंतराळविज्ञानात वेगाने झेप घेणाऱ्या रशियामध्ये लायका या श्वानाला स्पुटनिक-2 या यानामधून पाठविण्यात आले होते.
मॉस्को- अंतराळामध्ये जाणारा पहिला जिवंत प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लायकाला अंतराळात पाठवून 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. अंतराळविज्ञानात वेगाने झेप घेणाऱ्या रशियामध्ये लायका या श्वानाला स्पुटनिक-2 या यानामधून पाठविण्यात आले होते. 3 नोव्हेंबर 1957 रोजी लायकाला स्पुटनिकमधून पाठविण्यात आले होते. तिला यानामध्ये बसवून पाठविल्यानंतर काही तासांमध्येच तिचा मृत्यू झाला होता. रशियाचे तत्कालिन सर्वेसर्वा निकिटा ख्रुश्चेव्ह यांनी अंतराळविज्ञानाच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले होते.
लायकाला शोधणाऱ्या आदिल्या कोतोवस्काया यांनी असोसिएटेड प्रेसशी बोलताना सांगितले, "अंतराळ मोहिमेत पाठविण्यासाठी रशियामधील रस्त्यांवर कुत्र्यांचा शोध घेण्यात आला होता. त्यामध्ये लायकाने सर्व निकष पूर्ण केले त्यामुळेच तिची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली होती. फोटोजेनिक, विनम्र आणि युक्तीबाज अशा या श्वानाची तात्काळ निवड करण्यात आली." आपल्या मृत्यूची जाणिव झाल्यासारखी ती फोटोत गोंधळल्यासारखी दिसायची असे सांगत 90 वर्षिय आदिल्या म्हणाल्या," स्पुटनिकमध्ये बसवून पाठविण्यापुर्वी मी अत्यंत भावनिक झाले होते. मी तिला आम्हाला माफ कर असे सांगितले आणि रडले होते."
लायका अंतराळात गेल्यावर एक दिवसही जगू शकली नव्हती. काही तासच ती स्पुटनिकमध्ये जिवंत राहिली. मात्र सूर्यकिरणांपासून वाचण्यासाठी योग्य अशी सुविधा या यानामध्ये करण्यात आली होती. त्यामुळे तापमान प्रमाणाबाहेर वाढून लायकाचे प्राण गेले. पृथ्वीभोवती साधारण नऊ फेऱ्या झाल्यावरच तिचा मृत्यू झाला होता. ती जिवंत परत येणार नाही शास्त्रज्ञांना आदीपासूनच माहिती होते. परंतु तिच्या प्रशिक्षकांच्या अंदाजापेक्षा ती थोडी लवकरच मरण पावली होती. तिच्या मृत्यूची बातमी लपविण्यात आली होती. तसेच तिला पृथ्वीच्या कक्षेत येण्यापुर्वी खाण्यातून विष देऊन वेदनादायी मृत्यूपासून तिची सूटका केल्याचेही सांगण्यात येते. 14 एप्रिल 1858 रोजी तिचे अवशेष परत आलेल्या यानातून बाहेर काढण्यात आले. लायकानंतर तीन वर्षांनी वैज्ञानिकानी दोन नवे श्वान, काही उंदिर, ससेही अंतराळात पाठविले होते. हे सर्व प्राणी पृथ्वीवर जिवंत परत आले होते. त्यानंतर युरी गागारिन या अंतराळविराने पृथ्वीची कक्षा भेदून अंतराळात प्रवेश केला. युरी गागारिन हे पहिले अंतराळवीर होते.