६०० दहशतवादी तळ उद्धवस्त, ४ प्रमुख कमांडर ठार; गाझा पट्टीत इस्रायलची लष्करी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 08:35 PM2023-10-30T20:35:30+5:302023-10-30T20:44:41+5:30
Israel Palestine Conflict: गेल्या काही तासांत हमासचे चार प्रमुख कमांडर ठार झाल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण दलाने केला आहे.
गाझा पट्टीत हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध अजूनही सुरु आहे. गाझामध्ये आतापर्यंत ८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हमासच्या ६००हून अधिक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. इस्रायलचे सैन्य गाझामधील मुख्य शहरात पोहोचले आहे. गाझा सीमेत प्रवेश केल्याच्या सहाव्या दिवशी इस्रायलने शहराच्या पूर्व आणि पश्चिमेकडून रणगाडे आणि प्राणघातक शस्त्रांनी गोळीबार सुरू केला आहे. एवढेच नाही तर बोगद्याच्या आत लपलेल्या दहशतवाद्यांविरोधात स्पंज बॉम्बचा वापर करण्याची तयारी सुरू आहे.
इस्रायलच्या संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीमध्ये जमिनीवर हल्ले तीव्र करण्यात आले आहेत. गाझाच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचा शोध घेतला जात आहे. तेथे लपलेले दहशतवादी मारले जात आहेत. आतापर्यंत ६०० दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आयडीएफच्या सैनिकांनी इमारती आणि बोगद्यांमध्ये अडथळे आणून बसलेल्या जवळपास १२ दहशतवाद्यांना ठार केले. ते आमच्या जवानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये हमासचे चार प्रमुख आहेत, असे सांगितले जात आहे.
गेल्या काही तासांत हमासचे चार प्रमुख कमांडर ठार झाल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण दलाने केला आहे. यामध्ये जमील बाबा (हमासच्या सेंट्रल ब्रिगेडमधील नौदल दलाचे कमांडर), मुहम्मद सफादी (तुफा बटालियनमधील अँटी-टँक मिसाईल युनिटचे कमांडर), मुवामन हिजाझी (हमासच्या अँटी-टँक मिसाईल युनिटचे मुख्य ऑपरेटर) आणि मुहम्मद अवदल्लाह (हमास) यांचा समावेश आहे. हमासच्या उत्पादन विभागाचे प्रमुख एका वरिष्ठ ऑपरेटरच्या नावाचा समावेश आहे. यासोबतच हमासने बांधलेले १५० बोगदे आणि बंकरही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
उत्तर गाझा पट्टीमध्ये इस्रायली लष्कराला सर्वात मोठे यश मिळाले आहे. येथील हवाई हल्ल्यात हमासच्या ड्रोन विभागाचा कमांडर असीम अबू रक्का ठार झाला आहे. दिवस-रात्र, सकाळ-संध्याकाळ बॉम्ब पडत आहेत. अलिकडच्या वर्षांत असे विध्वंसाचे दृश्य जगाने क्वचितच पाहिले आहे. गाझामधील विध्वंस एवढा आहे की येथील ४० टक्के इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. ठिकठिकाणी पडक्या इमारतींचे ढिगारे पडले आहेत. पाणी, वीज आणि इंटरनेट सर्व काही खंडित करण्यात आले आहे. लोक आपल्या जीवाची याचना करत आहेत. इस्रायलचे मर्कावा रणगाडे हमासच्या दहशतवाद्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. एवढेच नाही तर इस्रायल पांढर्या फॉस्फरस बॉम्बचाही वापर करत आहे.
विरोधानंतरही इस्रायलची लष्करी कारवाई सुरूच-
इस्रायलच्या या हल्ल्याची जगभर चर्चा झाली. अनेक देश या युद्धाच्या विरोधात आहेत. अनेक देशांमध्ये आंदोलनेही होत आहेत, पण त्यामुळे इस्रायलला काही फरक पडत नाही, कारण त्याला फक्त हमासचा नाश करायचा आहे. इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी म्हणाले की, गाझामधील आमच्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही जे काही आवश्यक असेल ते करू. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे स्वतःच्या सैनिकांना भेटून त्यांना प्रोत्साहन देत आहेत.