६५ वर्षांच्या महिलेस होणार चौपाळे
By admin | Published: April 16, 2015 01:36 AM2015-04-16T01:36:34+5:302015-04-16T01:36:34+5:30
आतापर्यंत तेरा मुले व सात नातवंडे असणारी जर्मन महिला वयाच्या ६५ व्या वर्षी गर्भवती असून तिला चार मुले होणार आहेत.
बर्लिन : आतापर्यंत तेरा मुले व सात नातवंडे असणारी जर्मन महिला वयाच्या ६५ व्या वर्षी गर्भवती असून तिला चार मुले होणार आहेत. या वयात मुले होणे ही आश्चर्याची बाब राहिलेली नाही. पण ६५ व्या वर्षी चार मुले होणे ही मात्र निश्चितच दुर्मिळ गोष्ट आहे.
अनरग्रेट रौनिक असे या महिलेचे नाव असून सध्या तिला पाचवा महिना आहे. गर्भवती व मुले सुखरूप असल्याचे डॉक्टरांचे निदान आहे. एकाच वेळी चौपाळे जन्माला घालणारी ती पहिली वयोवृद्ध महिला ठरणार आहे. आपल्या वयाला आपण गर्भवती होऊ की नाही अशी तिला शंका होती. पण गर्भधारणा झाल्यानंतर मात्र या मुलांना वाढवायचेच असा तिचा निर्णय आहे.
६५ व्या वर्षी माता बनणार असली तरीही अनरग्रेट सर्वात वयोवृद्ध माता नाही. स्पेनमधील मारिया कार्मेन बौसुदा लारा या महिलेने २००६ साली वयाच्या ६६ व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे, तर भारतातील उत्तर प्रदेशातील ओंकारी पनवर या महिलेने तर २००८ साली वयाच्या ७० व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.
अनरग्रेटला १३ मुले
अनरग्रेट ही प्राथमिक शिक्षिका आहे. आपल्या प्रसूतीआधी ती निवृत्त होणार आहे. नऊ वर्षापूर्वी वयाच्या ५५ व्या वर्षी माता बनली तेव्हा ती जर्मन टीव्हीवर चमकली होती.
अनरग्रेट ही रशियन व इंग्रजी भाषेची प्राथमिक शिक्षिका आहे. या जगावेगळ्या प्रसूतीसाठी तिला किती खर्च आला हे ती सांगत नाही. पण नऊ वर्षापूर्वी तिने वयाच्या ५५ व्या वर्षी लीला या मुलीला जन्म दिला होता. त्यावेळी ती जर्मनीतील वयोवृद्ध माता ठरली होती. या १३ मुलातील सर्वात मोठे मूल ४३ वर्षांचे आहे. (वृत्तसंस्था)
४रजोनिवृत्तीच्या काळात गर्भधारणा व्हायची असेल तर त्यासाठी वेगळी प्रक्रिया आहे. त्यांना दुसऱ्या महिलेचे बीजांड घ्यावे लागते किंवा स्वत:चा गोठवलेला गर्भ वापरावा लागतो.
४महिलांची गर्भधारणेची क्षमता वयाबरोबर कमी होते. वयाच्या ३५ नंतर तर ती झपाट्याने कमी होते. त्यानंतर गर्भाशय गर्भधारणेस सक्षम आहे की नाही याची खात्री करून घ्यावी लागते. वय जास्त असणाऱ्या महिलांना गर्भधारणेच्या काळात रक्तदाब व मधुमेह असेही त्रास होतात.
मुलीच्या इच्छापूर्तीसाठी घेतला निर्णय
४तिची सर्वात लहान मुलगी लीला आता ९ वर्षांची आहे. तिला एक लहान बाळ हवे होते, पण आईला चार मुले होणार आहेत. ही मुले वाढविण्याचा ताण अनरग्रेटला नाही. पण लीला वयात येईपर्यंत ही मुले मोठी होतील. ही मुले मी वाढवू शकेन असा मला विश्वास आहे. माझी प्रकृती चांगली आहे, त्यामुळे चार मुले लहान असली तरीही नो प्रॉब्लेम, असे अनरग्रेट म्हणते.