येमेनमधील ६७० भारतीय सुरक्षित स्थळी
By admin | Published: April 6, 2015 02:41 AM2015-04-06T02:41:55+5:302015-04-06T02:41:55+5:30
युद्धग्रस्त येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी भारत सरकार कसोशीने प्रयत्न करीत असून भारतीय नौदलाने ‘आॅपरेशन राहत’तहत
नवी दिल्ली/इस्लामाबाद : युद्धग्रस्त येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी भारत सरकार कसोशीने प्रयत्न करीत असून भारतीय नौदलाने ‘आॅपरेशन राहत’तहत आयएनएस मुंबई (युद्धनौका) अॅडेननजीक तैनात केली आहे.
शनिवारी भारतीय नौदलाने अॅडेन बंदरावरून ६७० जणांना सुरक्षित ठिकाणी आणले. यात एक गर्भवती महिला आणि मुलांचा समावेश आहे. शनिवारी एकूण ८०० जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले, तसेच १९३ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विमान शनिवारी रात्री कोचीला पोहोचले. आणखी २ हजार भारतीय येमेनमध्ये अडकले असावेत, असा अंदाज आहे. भारतीय नौदलाची युद्धनौका (आयएनएस-मुंबई) जिबोतीनजीक पोहोचली असून जिबोतीत पोहोचलेल्या भारतीयांना विमानाने मायदेशी रवाना करण्यात येईल. येमेनमध्ये सौदी अरबच्या नेतृत्वाखाली मित्र फौजा आणि हुती बंडखोरांदरम्यान युद्ध पेटले असून गोळीबाराच्या फैरी झडत आहेत. अॅडेन बंदरातून आयएनएस मुंबई या युद्धनौकेपर्यंत भारतीयांना आणण्यासाठी १२ छोट्या नावांचा वापर करण्यात येत आहे, असे नौदलाने सांगितले. पाकिस्तान सरकारनेही आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी मोहीम हाती घेतली असून ११ भारतीय आणि १८४ पाकिस्तानी नागरिकांसह १८३ लोकांना पाकिस्तानच्या नौदलाच्या जहाजातून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
(वृत्तसंस्था)