तुरुंगातून पळण्यासाठी कैद्यांनी लावलेल्या आगीत 68 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 04:37 PM2018-03-29T16:37:13+5:302018-03-29T16:37:13+5:30
तुरुंगातून पळण्यासाठी कैद्यांनी लावलेल्या आगीत होरपळून सुमारे 68 जणांचा मृत्यू झाल्याची घटना
काराकस - तुरुंगातून पळण्यासाठी कैद्यांनी लावलेल्या आगीत होरपळून सुमारे 68 जणांचा मृत्यू झाल्याची घटना व्हेनेझुएलामध्ये घडली आहे. व्हेनेझुएलामधील एका तुरुंगातील कैद्यांनी कैदेतून पळ काढण्यासाठी बराकींमधील गाद्यांना आग लावली होती. मात्र या आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केल्याने त्यात अनेकजण होरपळले. कैद्यांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या संघटनेने ही माहिती दिली आहे.
व्हेनेझुएलामधील तुरुंग हे अतिरिक्त कैद्यांनी भरलेले आहेत. काराबोबोमधील तुरुंगात लागलेली ही आग येथील तुरुंगात होणाऱ्या दुर्घटनांपैकी एक आहे. यासंदर्भात मुख्य अभियोक्ता तारेक विल्यम साब यांनी ट्विटरवर सांगितले की, "काराबोबो येथील पोलिस मुख्यालयामध्ये झालेल्या भयावह दुर्घटना विचारात घेऊन आम्ही त्यांच्या तपासासाठी चार अभियोक्त्यांची नियुक्ती केली आहे. काकाबोबो येथील कारागृहात लागलेल्या आगीत 68 जणांचा मृत्यू झाला आहे."
उना वेनताना अ ला लिबरटाड नावाच्या संघटनेचे अध्यक्ष कार्लोस निएटो यांनी सांगितले की काही जणांचा मृत्यू हा होरपळून झाला तर काही जण गुदमरल्यामुळे मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. त्या महिला तुरुंगात बंद असलेल्या आपल्या नातेवाईकांस भेटण्यासाठी आल्या असाव्यात.
तुरुंगातून पळण्यासाठी कैद्यांनी गाद्यांना आग लावली होती. तसेच सुरक्षा रक्षकांच्या बंदुका चोरल्या होत्या. या दुर्घटनेनंतर संतापलेल्या कैद्यांच्या नातेवाईकांनी तुरुंगाबाहेर पोलिसांना मारहाण केली. शेवटी पोलिसांनी त्यांना पळवून लावण्यासाठई अश्रुधुराचे गोळे डागले.