७ भारतीय कंपन्या पुरवत आहेत 'इसिस'ला रसद

By admin | Published: February 26, 2016 03:54 AM2016-02-26T03:54:16+5:302016-02-26T09:08:28+5:30

२० देशांतील कंपन्यांकडून होत असलेल्या साहित्य पुरवठ्यातून इस्लामिक स्टेटचे (इसिस) घातक बॉम्ब आणि इतर दारूगोळा तयार होत असल्याचे एका अभ्यासात आढळून आले.

7 Indian companies are providing 'Isis' logistics | ७ भारतीय कंपन्या पुरवत आहेत 'इसिस'ला रसद

७ भारतीय कंपन्या पुरवत आहेत 'इसिस'ला रसद

Next

अंकारा : २० देशांतील कंपन्यांकडून होत असलेल्या साहित्य पुरवठ्यातून इस्लामिक स्टेटचे (इसिस) घातक बॉम्ब आणि इतर दारूगोळा तयार होत असल्याचे एका अभ्यासात आढळून आले. या पुरवठा साखळीत सात भारतीय कंपन्यांचा समावेश आहे हे उल्लेखनीय.
इसिसला विरोधी देशांतूनच साहित्य पुरवठा होत असल्याचे समोर आणत रसायने, केबल्स व इतर साहित्यांच्या प्रवाहावर नजर ठेवण्यासाठी सरकारे तसेच कंपन्यांना अधिक उपाय योजावे लागतील, असे या अहवालातून सुचविण्यात आले आहे. इसिसने आयईडी बनविण्यासाठी वापरलेल्या ७०० हून अधिक घटकांचा तुर्की, ब्राझील आणि अमेरिकेतील ५१ कंपन्यांशी संबंध आहे, असे कॉनफ्लिक्ट आर्मामेन्ट रिसर्चच्या (सीएआर) अभ्यासात आढळून आले.

या कंपन्यांनी संबंधित घटकांची निर्मिती किंवा विक्री केली. इसिसकडून आयईडीचे आता निम औद्योगिक स्तरावर उत्पादन केले जात असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. सीएआरने २० महिने अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे.
‘या स्वस्त आणि तयार साहित्याच्या विक्रीचे शस्त्रविक्रीच्या तुलनेत कमी नियमन होते. यातील काही घटकांना तर निर्यातीसाठी सरकारच्या परवान्याचीही गरज नाही. त्यामुळे इसिसला अत्यंत सहजरीत्या हे घटक प्राप्त होतात, असे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले. इसिसची ही रसद तोडण्यासाठी उत्पादक कंपन्यांना विक्रीपश्चात हे घटक नेमके कुठे जातात यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. तशी प्रणाली संबंधित कंपन्यांकडे असल्यास त्या प्रतिरोधकाचे काम करू शकतील,’ असे सीएआरचे कार्यकारी संचालक जेम्स बेवन म्हणाले. सीएआरला इराकी फेडरल पोलीस, वॉशिंग्टनपुरस्कृत कुर्दिश वायपीजी आणि कुर्दिस्तान रिजनल सेक्युरिटी कौन्सिल आणि कुर्दिस्तान रिजनल गव्हर्नर्मेंटच्या सुरक्षा दलांकडून या घटकांचे नमुने मिळाले होते.

इसिसचा सिरिया व इराकच्या मोठ्या भूभागावर ताबा आहे. या दोन्ही देशांचा शेजारी असलेल्या तुर्कीने इसिसचा शस्त्रपुरवठा रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. विरोधाभास म्हणजे इसिसच्या साहित्य पुरवठा साखळीतील कंपन्यांपैकी सर्वात जास्त १३ कंपन्या तुर्कीच्या आहेत. त्याखालोखाल भारताचा क्रमांक लागतो. इसिसला साहित्य पुरवठा करणाऱ्या साखळीत भारताच्या सात कंपन्यांचा समावेश आहे.

Web Title: 7 Indian companies are providing 'Isis' logistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.