इराणसाठी ७ इस्रायली करत होते हेरगिरी; अण्वस्त्रांपासून लष्करी तळांची माहिती दिली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 02:27 PM2024-10-23T14:27:21+5:302024-10-23T14:27:42+5:30
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटाेनी ब्लिंकन हे इस्रायलमध्ये शस्त्रसंधीच्या चर्चेसाठी दाखल झाले आहेत
तेल अवीव : इराणसाठी हेरगिरी करण्याच्या आराेपावरून इस्रायलच्या ७ नागरिकांना अटक करण्यात आली असून, ते गेल्या २ वर्षांपासून इराणसाठी हेरगिरी करीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे इराणने इस्रायलमध्ये हल्ले केले असून, त्यांना हेरगिरीच्या आराेपात मृत्युदंडाचीही शिक्षा हाेऊ शकते. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटाेनी ब्लिंकन हे इस्रायलमध्ये शस्त्रसंधीच्या चर्चेसाठी दाखल झाले आहेत.
इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे सर्व आराेपी उत्तर इस्रायलमध्ये राहणार आहेत. त्यांच्यामध्ये एका माजी सैनिकाचा समावेश असून, ताे काही वर्षांपूर्वी सैन्यातून पळून गेला हाेता. याशिवाय दाेन अल्पवयीन मुलांचाही त्यात समावेश आहे.
हिजबुल्लाहच्या मुख्य प्रवक्त्याने नेतन्याहू यांच्या निवासस्थानाला लक्ष्य केलेल्या ड्रोन हल्ल्यामागे त्यांचा गट होता, हे मान्य केले आहे. दरम्यान, इस्रायलने लेबनानमध्ये केलेल्या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
दाेन वर्षांत ६०० माेहिमा
- हेरगिरीच्या आराेपांवरून अटक करण्यात आलेल्यांनी गेल्या दाेन वर्षांत ६०० पेक्षा जास्त माेहिमा पूर्ण केल्या. पैशांच्या लाेभापायी ते इराणसाठी गाेपनीय माहिती गाेळा करीत हाेते.
- इस्रायलच्या लष्करी छावण्या, अण्वस्त्रे, दारूगाेळा इत्यादींची माहिती त्यांनी इराणला दिली आहे. माहितीच्या आधारेच इराणने इस्रायलमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
- फुग्यांद्वारे काढले फाेटाे
- गॅलिली येथील हवाई तळाचे फुग्यांच्या मदतीने फाेटाे काढण्यात आले हाेते. सर्व आराेपी तुर्कीच्या एका मध्यस्थाच्या संपर्कात हाेते.