दहशतवाद्यांना प्रशिक्षण, सात लाख कोटी रुपये दिले; इम्रान खान यांचा खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 09:45 AM2019-09-13T09:45:08+5:302019-09-13T09:49:11+5:30
अमेरिका आणि सोव्हिएत युनियन म्हणजेच रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू होते.
इस्लामाबाद : अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानने दहशतवाद्यांना जन्माला घातले आहे. एवढेच नाही तर दहशतवाद्यांवर अर्थव्यवस्थेचे सात लाख कोटी रुपये खर्च केले असल्याचा धक्कादायक खुलासा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. गृहमंत्र्यांच्या कबुलीनंतर पाकच्या पंतप्रधानांनीही अमेरिकेने पैसा दहशतवादासाठी पुरवल्याचे कबुल केले आहे.
अमेरिका आणि सोव्हिएत युनियन म्हणजेच रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. यावेळी सोव्हिएतविरोधात जिहाद पुकारण्यासाठी अमेरिका पैसे पुरवत होती, असा धक्कादायक खुलासा खान यांनी केला आहे. 80 च्या दशकात जेव्हा सोव्हिएतने अफगानिस्तानवर कब्जा केला तेव्हा आणि या मुजाहिद्दीन लोकांना त्यांच्याविरोधात दहशतवादाचे प्रशिक्षण दिले होते. त्यांना पाकिस्तानने प्रशिक्षण दिले होते. यासाठी अमेरिकेच्या सीआयएकडून पैसा पुरविला जात होता. आता एका दशकानंतर अफगाणिस्तानामध्ये अमेरिका आली आहे. त्याच जिहादींना अमेरिका दहशतवादी म्हणत असल्याच आरोपही खान यांनी केला.
हा मोठा विरोधाभास होता आणि मी तो अनुभवला. पाकिस्तानने तेव्हा तटस्थ राहायला हवे होते कारण यामध्ये सहभागी झाल्याने मोठा गट आमच्या विरोधात गेला आहे. आम्ही 70 हजार लोकांना गमावले. त्यांच्यावर अर्थव्यवस्थेचे 7 लाख कोटी रुपये खर्च केले. शेवटी अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये यश न मिळविल्याचा ठपका पाकिस्तानवर ठेवला. मला वाटते हा पाकिस्तानवर झालेला अन्याय आहे, असे इम्रान खान म्हणाले.
Pakistani PM Imran Khan: We lost 70,000 people, we lost over a 100 billion dollars to the economy. In the end, we were blamed for the Americans not succeeding in Afghanistan. I felt it was very unfair on Pakistan. (3/3)
— ANI (@ANI) September 13, 2019
गुरुवारी पाकिस्तानचे गृहमंत्री एजाज अहमद शाह यांनी दहशतवादी संघटना जमात उद दावावर अब्जावधी रुपये उधळल्याचे कबुल केले होते. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानी सरकारने दहशतवाद्यांवर अब्जावदी रुपये उडविले कारण ते मुख्य प्रवाहात रहावेत. ते सरकारच्याच इशाऱ्यावर अफगाणिस्तानमध्ये लढले होते. यामुळे त्यांची जबाबदारी होती की या दहशतवाद्यांना नोकरी आणि पैसे देण्याची.
याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीदेखील अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रीय असल्याची कबुली दिली होती. 'पाकिस्तानात 30 ते 40 हजार दहशतवादी आहेत. या दहशतवाद्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर ते अफगाणिस्तान, काश्मीरमध्ये सक्रीय होतात', असं खान म्हणाले होते. आधीच्या सरकारांनी दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नव्हती. मात्र आपल्या सरकारनं दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केल्याचा दावा त्यांनी केला होता.