धन धना धन! यूट्यूब व्हिडीओतून 7 वर्षांच्या मुलानं कमावले 1.5 अब्ज रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 08:21 PM2018-12-04T20:21:52+5:302018-12-04T20:26:07+5:30
अवघ्या काही मिनिटांमध्ये व्हिडीओंना लाखो व्ह्यूज
मुंबई: खेळण्यांच्या रिव्ह्यूमधून एका 7 वर्षीय मुलानं तब्बल 22 मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. या मुलाचं नाव रेयान आहे. यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत रेयाननं पहिला क्रमांक पटकावला आहे. रेयानच्या व्हिडीओंना अवघ्या काही मिनिटांमध्ये लाखो रुपये मिळतात. गेल्या वर्षभरात रेयाननं यूट्यूबवरील व्हिडीओंच्या माध्यमातून 22 मिलियन डॉलर्स (1,55,13,30,000 रुपये) कमावले आहेत. आधीच्या वर्षाच्या तुलनेत यंदा त्याच्या कमाईत दुपटीनं वाढ झाली आहे.
सर्वाधिक कमाई करणाऱ्या यूट्यूबर्सची यादी फोर्ब्स मासिकानं तयार केली आहे. यामध्ये रेयान टॉईज रिव्ह्यू हे यूट्यूब चॅनल चालवणारा रायन पहिल्या स्थानी आहे. रेयाननंतर जेक पॉल (21.5 मिलियन डॉलर्स) आणि 'द ड्यूड परफेक्ट' (20 मिलियन) यांचा क्रमांक लागतो. रेयानच्या कमाईत कर आणि एजंट-वकिलांचं शुल्क धरण्यात आलेलं नाही. लोकांचं मनोरंजन होत असल्यानं माझे व्हिडीओ पाहिले जात असावेत, असं रायननं एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितलं.
रेयानच्या पालकांनी मार्च 2015 मध्ये रायन टॉईज रिव्ह्यू हे यूट्यूब चॅनल सुरू केलं. रेयानच्या व्हिडीओला आतापर्यंत 26 अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच्या यूट्यूब फॉलोअर्सची संख्या 1.73 कोटी इतकी आहे. रायनची गेल्या वर्षभरातली कमाई 22 मिलियन इतकी आहे. यातले 1 मिलियन त्याला व्हिडीओ सुरू होण्याआधी दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमधून मिळाले आहेत आणि बाकीची कमाई प्रायोजकांच्या माध्यमातून झाली आहे.
रेयानच्या चॅनेलवर दाखवल्या जाणाऱ्या खेळण्यांची विक्री अगदी जोरात होते. त्यामुळेच वॉलमार्टनं रेयानला करारबद्ध केलं आहे. रेयान्स वर्ल्ड या नावाखाली वॉलमार्टकडून अमेरिकेच्या 2500 दुकानांमध्ये खेळण्यांची विक्री केली जाते. वॉलमार्टनं ऑगस्टमध्ये रेयान वर्ल्ड या नावानं कपडे आणि खेळण्यांचा ब्रँडदेखील लॉन्च केला आहे. यामधूनही रेयान कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.