७० वर्षांच्या सहजीवनाचा शेवटही लगोलग मृत्यूने!
By Admin | Published: April 4, 2017 06:20 PM2017-04-04T18:20:26+5:302017-04-04T18:20:26+5:30
तब्बल ७० वर्षांच्या सहजीवनानंतर एका ब्रिटिश दाम्पत्याचा अवघ्या चार मिनिटांच्या अंतराने मृत्यू झाला. यातील विल्फ रसेल या ९३ वर्षांच्या पतीचे
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि.4 - तब्बल ७० वर्षांच्या सहजीवनानंतर एका ब्रिटिश दाम्पत्याचा अवघ्या चार मिनिटांच्या अंतराने मृत्यू झाला. यातील विल्फ रसेल या ९३ वर्षांच्या पतीचे गेल्या बुधवारी सकाळी ६.५० वाजता निधन झाले आणि त्यांची ९१ वर्षांची पत्नी वेरा हिने सकाळी ६.५४ वाजता अखेरचा श्वास घेतला.
ही विचित्र योगायोगाची घटना लिचेस्टरशायर परगण्यात घडली. तेथील विंग्स्टन शहरातील मॅग्ना केअर होममध्ये विल्फ यांना ठेवलेले होते तर त्याच्या शेजारीच असलेल्या लिचेस्टर रॉयल इन्फर्मरीमध्ये वेराची सुश्रुशा केली जात होती. विल्फ यांना गेले काही दिवस स्मृतिभ्रंश झाला होता व ते अीपल्या पत्नीलाही ओळखेनासे झाले होते. पती आपल्याला ओळखही दाखवत नाही या चिंतेने वेरा यांनीही अंथरुण धरले होते.
या दाम्पत्याची नात स्टेफनी वेल्च हिने ‘लिचेस्टर मर्क्युरी’ वृत्तपत्रास सांगितले की, आजोबांना वर्षभरापूर्वी स्मृतिभ्रंश झाला व दोन महिन्यांपूर्वी त्यांना केअर होममध्ये ठेवण्यात आले. काही दिवसांपूर्वी आजी त्यांना भेटायला गेली तेव्हा त्यांनी तिला ओळखलेही नाही. त्या दिवसापासून आजीची प्रकृतीही खालावत गेली.
स्टेफनी म्हणाली की, गेल्या रविवारी मी आजीला भेटायला रॉयल इन्फर्मरीमध्ये गेले तेव्हा सर्वप्रथम तिने विल्फ कसे आहेत, याची चौकशी केली. ‘आमचा जोडा किती छान आहे ना?’, हा तिने मला विचारलेला शेवटचा प्रश्न होता.
आजोबा गेले आणि लगोलग चार मिनिटांनी आजीनेही प्राण सोडले. आजोबा गेल्याचे तिला कुणी सांगितले नाही, पण बहुधा ती त्यांच्या जाण्याची वाट पाहात होती, असे वाटते. आजोबांनी ओळखणेही बंद केले हे आजीच्या मनाला खूप लागले होते, असेही स्टेफनी हिने सांगितले.
स्टेफनी म्हणते की, विल्फ आणि वेरा हे एक आदर्श जोडपे होते व त्यांचे स्वभावही एकमेकांना पूरक असेच होते. दोघांनीही कुटुंबावर जीवापाड प्रेम केले व सर्वांचे उत्तम संगोपन केले. आजोबांना केअर होममध्ये ठेवेपर्यंत दोघे एक दिवसही एकमेकांना सोडून राहिले नव्हते.
- या दोघांची प्रथम भेट झाली तेव्हा विल्फ १८ वर्षांचा व वेरा १६ वर्षांची होती.
- दोघे प्रेमात पडले. पुढे विल्फ अभियंता झाला व सैन्यात दाखल झाला.
- दुसरे महायुद्ध सुरु झाले व विल्फला उत्तर आफ्रिकेत जावे लागले. तेथे जाण्यापूर्वी दोघांचा साखरपुडा झाला.
- आफ्रिकेतून विल्फ परत आल्यावर दोघांनी लग्न केले व त्यानंतर विल्फने मध्य इंग्लडमध्ये अभियंता म्हणून नोकरी केली.