बॉम्बमुळे ७० हजार लोकांचे स्थलांतर
By admin | Published: February 13, 2017 12:26 AM2017-02-13T00:26:57+5:302017-02-13T00:26:57+5:30
थेसालोनिकी या ग्रीसमधील दुसऱ्या क्रमांकाच्या शहरात सापडलेला दुसऱ्या महायुद्धातील एक बॉम्ब निकामी करण्यासाठी स्थानिक
अॅथेन्स : थेसालोनिकी या ग्रीसमधील दुसऱ्या क्रमांकाच्या शहरात सापडलेला दुसऱ्या महायुद्धातील एक बॉम्ब निकामी करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांत खबरदारीचा उपाय म्हणून तब्बल ७० हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले.
उत्तर ग्रीसमधील या शहरात एका रस्त्यासाठी खोदकाम सुरु असता गेल्या आठवड्यात २५० किलो स्फोटके असलेला हा जिवंत बॉम्ब सापडला होता. हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धातील आहे. या महायुद्धात ग्रीस दोन्हीपैकी कोणत्याही बाजूने प्रत्यक्ष युद्धात उतरले नव्हते. त्यामुळे हा बॉम्ब त्यावेळी नेमका कोणी व केव्हा टाकला याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही.
एवढा शक्तिशाली जिवंत बॉम्ब सापडणे व तो निकामी करण्यासाठी दाट लोकवस्ती असलेले शहराचे बरेच भाग खाली करावे लागणे या दोन्ही दृष्टीने ग्रीसच्या बाबतीत ही घटना न भूतो अशीच म्हणावी लागेल. बॉम्ब सापडला त्या ठिकाणाच्या १.९ किमी परिघातील सर्व लोकवस्ती हलविली गेली. यात दोन कामगारवस्त्यांचाही समावेश आहे.
सुमारे एक हजार पोलीस अधिकारी गेले दोन दिवस हे काम करीत होते. प्रसिद्धी माध्यमे, छापील पत्रके व समाजमाध्यमांवर संदेश टाकून त्या भागांतील रहिवाशांना नियोजित स्थलांतराची आधीच कल्पना देण्यात आली.
सर्वप्रथम २० रुग्णवाहिका कामाला लावून ३०० हून अधिक अपंग व्यक्ती व अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. गेल्या वर्षभरात आफ्रिका व आशियातून आलेल्या स्थलांतरितांसाठी शहराच्या हद्दीजवळ उभारलेली हंगामी निर्वा सित शिबिरेही खाली करावी लागली. (वृत्तसंस्था)
अनेक ठिकाणी सापडले बॉम्ब
दुसरे महायुद्ध संपून ७० वर्षे झाल्यावर, त्या वेळचे न फुटलेले बॉम्ब जगाच्या अनेक भागांत अजूनही मिळत आहेत.
२३ जानेवारी रोजी हाँगकाँग विद्यापीठाजवळ सापडलेला बॉम्ब निकामी करण्यासाठी अनेक लोकांना अन्यत्र हलवावे लागले होते.
त्या आधी २०जानेवारी रोजी लंडनमध्ये ब्रिटिश संसदेजवळ सापडलेला एक बॉम्ब नौदलाने निकामी केला होता.
दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनने टाकलेला बॉम्ब जर्मनीमधील आॅसबर्ग शहरात २५ डिसेंबर रोजी सापडला होता. त्या वेळी त्या भागातील ५४ हजार लोकांना राहती घरे सोडून अन्यत्र जावे लागल्याने, त्यांच्या नाताळाच्या आनंदावर विरजण पडले होते.