जगात ७१ लाख रुग्ण, चार लाख मृत्यू, भीतीचे सावट कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 06:16 AM2020-06-09T06:16:55+5:302020-06-09T06:17:32+5:30
जगात रोज १ लाख नवे रुग्ण, त्यापैकी १० हजार भारतातील
नवी दिल्ली : भारतात लॉकडाऊन उठण्यास सुरुवात झालेली असतानाच्या पहिल्याच दिवशी देशभरात कोरोनाचे १० हजारांवर रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या २ लाख ५६ हजारांवर गेली, तर मृत्यूची संख्या ७ हजार २०० वर गेली आहे. एकीकडे भारताची ही स्थिती असताना तिकडे जगभरात दररोज सुमारे १ लाखावर रुग्ण वाढत आहेत. सोमवारी जगातील रुग्णसंख्या ७१ लाखांवर गेली, तर मृत्यूच्या संख्येने ४ लाखांचा टप्पा ओलांडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. भारतात सोमवारपासून काही नियमांसह हॉटेल, मॉल, धार्मिक स्थळे उघडण्यात आली असून, मुंबई व महाराष्टÑात बसला झालेली प्रचंड गर्दी, रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी चिंता वाढवण्यास कारणीभूत ठरेल की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
देशात कोरोनाने हात-पाय पसरू नयेत, म्हणून देशात सर्वप्रथम मार्चमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर तो वाढवत वाढवत १ जूनपर्यंत लागू करण्यात आला. त्यानंतर देश अनलॉक करण्यास सरकारने प्रारंभ करण्याचे सूतोवाच केले व काही अटी, नियमांसह कंटेन्मेंट झोनच्या बाहेर मर्यादित व्यवहार सुरू करण्याचे जाहीर केले. त्यानुसार, सोमवारी देशभरातील हॉटेल, शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळे कोरोनाला हरवण्याच्या उपाययोजनांसह सुरू करण्यात आली. मात्र, याच दिवशी देशात सर्वाधिक म्हणजे १० हजारांवर कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत व ही अत्यंत चिंताजनक बाब समजली जाते. देशातील मृतांची संख्याही प्रथमच ७ हजार २०० च्या पुढे गेली आहे. तसेच देशातील एकूण रुग्णसंख्या २ लाख ५६ हजारांच्या पुढे गेली. सध्या देशात १,२४,९८१ अॅक्टिव्ह रुग्ण असून, १,२४,४२९ रुग्ण बरे झालेले आहेत.
भारतातील आता एकही असे राज्य उरलेले नाही जेथे कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. देशात कोरोनाचा संसर्ग होण्याच्या सुरुवातीच्या काळात ईशान्येकडील काही राज्ये यापासून दूर होती. मात्र, नंतर तेथेही कोरोना शिरला. सध्या अरुणाचल प्रदेशात ५६, सिक्कीममध्ये १, त्रिपुरामध्ये ६०८, मिझोराममध्ये ३३, नागालँडमध्ये ११०, मेघालयात २२, मणिपूरमध्ये १२० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यांत महाराष्टÑ, तामिळनाडू, दिल्ली आदी राज्यांचा समावेश आहे.
भारतातील रुग्णसंख्या अडीच लाखांच्या पलीकडे पोहोचली असतानाच लॉकडाऊनचे नियम शिथिल केले आहेत. त्यातच मागील आठ दिवसांत देशात दररोज ८ ते ९ हजारांनी रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब समजली जाते.
जगात ३४ लाखांवर रुग्ण बरे
जगात सोमवारी मृत्यूसंख्या ४ लाखांवर गेली. अमेरिकेत सर्वाधिक १,१२,४७७ मृत्यू झाले आहेत. रुग्णसंख्येच्या यादीत भारत आता सहाव्या क्रमांकावर आहे. जगात ३४ लाखांवर लोक बरे झाले. ७१ लाखांवरील रुग्णांपैकी २० लाखांवर रुग्ण एकट्या अमेरिकेत आहेत.
राज्यात ८८,५२८ रुग्ण लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सोमवारपासून अनलॉकचा पहिला टप्पा सुरू झाला असतानाच दिवसभरात २ हजार ५५३ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले, तर १०९ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील रुग्णांची एकूण संख्या ८८ हजार ५२८, तर मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ३ हजार १६९ वर पोहोचला आहे. राज्यात सध्या ४४ हजार ३७४ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४६.२८ टक्क्यांवर पोहोचले असून मृत्यूदर ३.५७ टक्के इतका झाला आहे. मृत्यू झालेल्या १०९ रुग्णांमध्ये मुंबई ६४, (पान ५ वर)
केजरीवाल सेल्फ क्वारंटाइनमध्ये
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ताप आला असून, ते सेल्फ क्वारंटाईनमध्ये गेले आहेत. मधुमेहाचे रुग्ण असलेले ५१ वर्षीय केजरीवाल यांचा घसाही सुजल्याने ते मंगळवारी कोरोनाची चाचणी करून घेणार आहेत. हे आजारपण नेमके कशामुळे आहे, हे स्पष्ट होईपर्यंत केजरीवाल स्वत:हून इतरांपासून दूर राहणार आहेत. रविवारी केजरीवाल यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती.
मुंबईची रुग्णसंख्या ५० हजारांवर
राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र दुसरीकडे मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येने ५० हजारांचा आकडा पार केला आहे. सोमवारी येथील रुग्णसंख्या ५० हजार ८५ वर पोहोचली, तर दिवसभरात १ हजार ३१४ रुग्णांचे निदान झाले असून ६४ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत २६ हजार ३४५ सक्रिय रुग्ण आहेत. शहर-उपनगरात सोमवारी नोंद झालेल्या ६४ मृत्यूंपैकी ४३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील ४४ रुग्ण पुरुष व २० रुग्ण महिला होत्या.