स्वत:ला ब्रह्मांडाचा स्वामी, ‘देवाचा पुत्र’ मानायचा; मानवी तस्करीत गेला तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 06:55 AM2024-09-11T06:55:39+5:302024-09-11T06:56:04+5:30

बाल लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीच्या आरोपाखाली अटक

74-year-old pastor Apollo Quiboloy has been arrested in the Philippines on charges of child sexual abuse, human trafficking. | स्वत:ला ब्रह्मांडाचा स्वामी, ‘देवाचा पुत्र’ मानायचा; मानवी तस्करीत गेला तुरुंगात

स्वत:ला ब्रह्मांडाचा स्वामी, ‘देवाचा पुत्र’ मानायचा; मानवी तस्करीत गेला तुरुंगात

मनीला : स्वत:ला ब्रह्मांडाचा स्वामी आणि मी देवाचा पुत्र आहे, असा दावा करणाऱ्या ७४ वर्षीय पादरी अपोलो क्विबोलॉय याला फिलीपिन्समध्ये बाल लैंगिक शोषण, मानवी तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्या शोधासाठी दोन आठवड्यांपासून २ हजार पोलिसांनी शस्त्रांसह दावाओ शहरातील ७४ एकरांवर पसरलेल्या त्याच्या किंगडम ऑफ जिझस क्राइस्ट (केओजेसी) चर्चच्या मुख्यालयाला वेढा घातला होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी हेलिकॉप्टरचाही वापर करावा लागला.

देणगीच्या पैशातून खासगी जेट अन् मालमत्ता घेतल्या

क्विबोलॉयने १२ ते २५ वर्षे वयोगटातील मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण, तस्करी केली.  त्याच्या आदेशांचे उल्लंघन केल्याचे ‘पाप’ म्हणून त्यांना बाहेरील प्रार्थना पर्वतावर पाठवण्यात येत होते. तेथे त्यांचे मुंडण करणे, मारहाण करणे असे प्रायश्चित होत असे. एफबीआयने सांगितले की, चर्चच्या सदस्यांना फसव्या व्हिसावर अमेरिकेत पाठविले जाई आणि त्यांना तिथे मुलांच्या धर्मादाय संस्थेसाठी देणग्या मागण्यासाठी भाग पाडले जाई. या संपत्तीच्या जोरावर क्विबोलॉयने प्रायव्हेट जेट, आलिशान मालमत्ता खरेदी केल्या.

श्रद्धेच्या नावाखाली जबरदस्तीने गुलामी
आपल्या आध्यात्मिक साम्राज्यात क्विबोलॉय याने गरीब महिला आणि मुलांचे शोषण केले. अशा लोकांना श्रद्धेच्या नावाखाली गुलामगिरीच्या जीवनात ढकलले गेले. २०२१मध्ये क्विबोलॉयला  अनेक आरोपाखाली अमेरिकेने दोषी ठरवले होते. 

सत्तेत किंगमेकर

क्विबोलॉयने १९८५मध्ये केओजेसीची स्थापना केली. ती सुरुवातीला छोटी धार्मिक संस्था होती. परंतु, ती नंतर वेगाने वाढली आणि फिलीपिन्स आणि २००हून अधिक देशांमध्ये लाखो अनुयायी त्याच्याकडे आकर्षित झाले. माजी राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो दुतेर्ते यांचे ‘आध्यात्मिक सल्लागार’ म्हणून प्रसिद्ध झालेला  क्विबोलॉय निवडणुकीत किंगमेकर ठरला. दुतेर्ते यांची सत्ता गेल्यानंतर त्याच्या वाईट दिवसांची सुरुवात झाली.

Web Title: 74-year-old pastor Apollo Quiboloy has been arrested in the Philippines on charges of child sexual abuse, human trafficking.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.