75 वर्षांच्या 'क्रोकोडाईल'कडे झिम्बाब्वेचा कारभार? हा तर नवा मुगाबे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 12:06 PM2017-11-20T12:06:52+5:302017-11-20T12:15:39+5:30
झिम्बाब्वेमधील सध्याच्या राजकीय हालचालींकडे पाहात मुगाबे यांनी पदच्युत केलेल्या उपाध्यक्ष इमर्सन म्नान्गग्वा यांच्याकडे सत्ता येण्याची सर्वाधीक शक्यता आहे. इमर्सन हे झिम्बाब्वेमध्ये क्रोकोडाईल नावाने ओळखले जातात.
हरारे- 37 वर्षे झिम्बाब्वेच्या सत्तेमध्ये राहिल्यानंतर रॉबर्ट मुगाबे यांच्याजागी आता नवा नेता येण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वेमधील सध्याच्या राजकीय हालचालींकडे पाहात मुगाबे यांनी पदच्युत केलेल्या उपाध्यक्ष इमर्सन म्नान्गग्वा यांच्याकडे सत्ता येण्याची सर्वाधीक शक्यता आहे. इमर्सन हे झिम्बाब्वेमध्ये क्रोकोडाईल नावाने ओळखले जातात.
इमर्सन म्नान्गग्वा हे गेली अनेक दशके मुगाबे यांना राजकीय क्षेत्रात मदत करण्याचे काम करत होते. त्यांच्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या अधिकारांमुळे ते शक्तीशाली झाले. अत्यंत कठोर नेता म्हणूनही ते ओळखले जातात. मुगाबे यांनी घेतलेले निर्णय कठोरपणे राबवण्यासाठीच त्यांनी या शक्तीचा वापर केला. जनतेमध्ये लोकप्रियता मिळवण्यापेक्षा सुरक्षा दले आणि सैन्यामध्ये त्यांनी स्वतःचे पाठिराखे तयार केले. त्याचाच उपयोग त्यांना या लष्करी बंडाच्या वेळेस होत आहे.
We know our citizens have been waiting for Mugabe to resign, but he hasn't. Now the power of the people is the strongest. The people have spoken! He must quit or we force him out. It is now our turn, the Congress have it now for us. Impeachment!
— Emerson Mnangagwa (@HonMnangagwa_ED) November 19, 2017
One nation, #Zimbabwe
2014 साली इमर्सन झिम्बाब्वेचे उपराष्ट्राध्यक्ष बनले. ते क्रोकोडाईल या नावाने तर त्यांचे सहकारी टीम लॅकोस्ट या ब्रॅंडच्या क्रोकोडाईल (मगर) या ब्रॅंडमुळे टीम लॅकोस्ट असे ओळखले जातात. अत्यंत लहान वयातच त्यांनी रोडेशियाच्या वंशवादी सरकारविरोधात एल्गार पुकारला होता. 1960 च्या दशकामध्ये त्यांनी सरकारविरोधात कारवायांना सुरुवात केली. 1963 साली त्यांनी इजिप्त आणि चीनमधून लष्करी प्रशिक्षणही घेतले. रेल्वे उडवून दिल्याबद्दल 1965 साली त्यांना सरकारने पकडले होते. तत्कालिन सरकारने त्यांचा बंदिवासात छळही केला होता. त्यांना सरकारने फाशीची शिक्षाही ठोठावली होती मात्र वयाची 21 वर्षे पूर्ण झाली नसल्यामुळे त्या शिक्षेचे रुपांतर 10 वर्षांच्या कारावासात करण्यात आले. कारावासात इमर्सन यांचा संपर्क मुगाबे आणि इतर क्रांतीकारकांशी आला. कारागृहातच त्यांनी शालेय अभ्यासक्रम पूर्ण केला 1975 साली त्यांची मुक्तता झाली. त्यानंतर झाम्बियामध्ये जाऊन त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. त्यानंतर नव्याने निर्माण झालेल्या मोझाम्बिकमध्ये जाऊन चे मुगाबे यांचे सहकारी आणि अंगरक्षक बनले. 1979 साली लंडनमध्ये लॅन्सेस्टर हाऊस बैठकीमध्ये मुगाबे यांच्याबरोबर इमर्सनही गेले होते. या बैठकीमध्ये झिम्बाब्वेच्या स्वातंत्र्याची चर्चा सुरु झाली.
1980 साली झिम्बाब्वे स्वतंत्र झाल्यावर त्यांच्याकडे मिनिस्टर ऑफ सिक्युरीटी अशी जबाबदारी सोपवण्यात आली. मुगाबे यांच्या क्रांतीकारक फौजा, विरोधी नेते जोशुआ न्कोमो यांच्या फौजा आणि जुने रोडेशेयिन सैन्य एकत्र करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 1983मध्ये मुगाबे यांनी न्कोमो यांच्या पाठिराख्यांविरोधा मोहीम काढली याला मताबेलेलॅंड हत्याकांड असे ओळखले जातात. त्यामध्ये 10,000 ते 20,000 लोक मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात येते. हे घडवून आणण्यासाठी सैन्याच्या तुकडीला उत्तर कोरियाकडून प्रशिक्षण देण्याचे काम इमर्सन यांनी केले असा आरोप त्यांच्यावर केला जातो.
गेली अनेक वर्षे इमर्सन यांनी स्वतःची अनुभवी नेता अशी प्रतिमा निर्माण केली आणि आपण देशाला स्थैर्य देऊ शकतो असा समज पद्धतशीरपणे पसरवण्यास सुरुवात केली. मुगाबे आणि इमर्सन यांच्यामध्ये तसा कोणताच फरक नाही. वयाची 92 वर्षे पूर्ण होऊनही मुगाबेंना सत्ता सोडाविशी वाटत नव्हती, त्यासाठीच त्यांनी पत्नी ग्रेसला सत्ता सोपविण्याची हालचाल सुरु केली होती. इमर्सनसुद्धा 75 वर्षांचे आहेत. सत्तांतर झाले तरी नेतृत्त्वाच्या मानसिकतेत फारसा बदल दिसून येणार नाही असे तज्ज्ञांना वाटते.