स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव कॅनडात दिमाखात साजरा!
By मनोहर कुंभेजकर | Published: August 22, 2022 10:27 AM2022-08-22T10:27:35+5:302022-08-22T10:28:52+5:30
Azadi Ka Amrit Mahotsav : भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव कॅनडात आज दुपारी 1.30 ते 4 या वेळेत सुमारे अडीच तीन तास कॅनडात (भारतीय वेळेनुसार मध्यरात्री) स्थायिक झालेल्या आपल्या 28 राज्यां मधील सुमारे 15000 भारतीयांनी दिमाखात साजरा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा या आवाहनाला प्रतिसाद देत कॅनडात स्थायिक झालेल्या लाखो भारतीयांनी देशाच्या स्वातंत्र्याचा 75 व्या अमृत महोत्सवदिनी आपल्या घरांवर तिरंगा फडकवला होता. मात्र, काल रविवारची येथे सुट्टी असल्याने कॅनडा,टोरंटो येथील नॅथन फिलिप्स स्क्वेअर परिसरात सुमारे 15000 भारतीयांनी वाजत गाजत सुमारे 2 किमीची भव्य तिरंगा यात्रा काढली.
भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव कॅनडात आज दुपारी 1.30 ते 4 या वेळेत सुमारे अडीच तीन तास कॅनडात (भारतीय वेळेनुसार मध्यरात्री) स्थायिक झालेल्या आपल्या 28 राज्यां मधील सुमारे 15000 भारतीयांनी दिमाखात साजरा केला. टोरंटो येथील नॅथन फिलिप्स स्क्वेअर परिसरात वाजत गाजत सुमारे 2 किमीची भव्य तिरंगा यात्रा देशाचा झेंडा फडकवत काढण्यात आली. पॅनोरमा इंडियाने ही तिरंगा रॅली आयोजित केली होती.
यावेळी भारतातील विविध राज्यातील नागरिकांनी आपली कला, नृत्य सादर केले. यात मराठी नागरिकांचे ढोलताशांच्या गजरात त्यांनी सादर केलेले लेझीम, पंजाबी नागरिकांचे भांगडा नृत्य, गुजराथी नागरिकांचा गरबा यांनी या तिरंगा रॅलीत शोभा आणली. तर स्टेजवर अनेक सांस्कृतिक आणि संगीत मैफिल कार्यक्रमांचा उपस्थित हजारो नागरिकांनी आस्वाद घेतला.
या तिरंगा रॅलीत मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी,भारत माता की जय असा जयघोष करत डोक्यावर फेटा व नऊवारी साडी अश्या आपल्या मराठमोळ्या वेशभूषेत महिलांनी लेझीम सादर केले. नाशिक ढोलच्या गजरात संपूर्ण परिसारत जल्लोष आणि उत्सवचे वातावरण होते. बॉलीवूड स्टार्स मुग्धा गोडसे आणि राहुल देव यांनी या तिरंगा रॅलीत सहभाग घेतला.
येथे अनेक खाद्य पदार्थांची रेलचेल होती. येथे विविध प्रकारचे अनेक खाद्यस्टॉल्स लावण्यात आले होते. अनेकांनी वडापावचा आणि अन्य खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. तर येथील परदेशी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती. येत्या 31 ऑगस्टला कॅनडात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त खास विक्रीसाठी डेकोरेशनच्या साहित्याचा देखिल येथे स्टॉल होता.