८ कोटी लोक उपाशी, तरीही अन्नाची नासाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 11:44 AM2024-03-29T11:44:46+5:302024-03-29T11:45:17+5:30
अहवाल २०३० पर्यंत अन्न नासाडी निम्मी करण्यासाठी देशांच्या प्रगतीचा मागोवा घेतो.
नैरोबी (केनिया) : २०२२ मध्ये जागतिक स्तरावर उत्पादित झालेल्या अन्नापैकी सुमारे १.०५ अब्ज (१८ टक्के) मेट्रिक टन जगाने वाया घालवले, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका नवीन अहवालात म्हटले आहे.
अहवाल २०३० पर्यंत अन्न नासाडी निम्मी करण्यासाठी देशांच्या प्रगतीचा मागोवा घेतो. अहवाल देणाऱ्या देशांची संख्या २०२१ मधील पहिल्या अहवालापेक्षा जवळपास दुप्पट झाली आहे. २०२१ च्या अहवालात असा अंदाज आहे की, २०१९ मध्ये जागतिक स्तरावर उत्पादित झालेल्या अन्नांपैकी १७ टक्के किंवा ९३१ दशलक्ष मेट्रिक टन (१.०३ अब्ज टन) वाया गेले; परंतु अनेक देशांकडे पुरेसा डेटा नसल्यामुळे लेखकांनी थेट तुलना न करण्याचा इशारा दिला.
जगभरात अनेक ठिकाणी अन्नसंकट
संशोधक क्लेमेंटाईन ओकॉनर म्हणाले, अन्न नासाडी निर्देशांक सर्व काही सांगत नाही. परंतु, सहकार्य आणि पद्धतशीर कृतीद्वारे ही समस्या हाताळली जाऊ शकते.
हा अहवाल अशावेळी आला आहे, जेव्हा जगभरातील ७ कोटी ८३ लाख लोकांना दीर्घकाळ उपासमारीचा आणि अनेक ठिकाणी अन्न संकटाचा सामना करावा लागतो. अहवालात म्हटले आहे की, केनियामध्ये अन्नाचा अपव्यय ही चिंताजनक बाब आहे. दरवर्षी अंदाजे ४.४५ दशलक्ष टन अन्न वाया जाते.