मिसिसिपीमध्ये झालेल्या गोळीबारात 8 जणांचा मृत्यू, संशयिताला अटक
By admin | Published: May 28, 2017 09:06 PM2017-05-28T21:06:39+5:302017-05-28T21:06:39+5:30
अमेरिकेतल्या मिसिसिपी येथे एका व्यक्तीनं केलेल्या गोळीबारात 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
ऑनलाइन लोकमत
जॅक्सन, दि. 28 - अमेरिकेतल्या मिसिसिपी येथे एका व्यक्तीनं केलेल्या गोळीबारात 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या गोळीबारात डेप्युटी शेरीफचाही समावेश आहे. संशयित गोळीबार करणा-या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिसिसिपीतील तपास यंत्रणेचे प्रवक्ते वॉरेन स्ट्रेन यांच्या मते, लिंकन काऊंटी येथील तीन वेगवेगळ्या घरांमध्ये हा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. संशयिताविरोधात अद्याप आरोप निश्चित करण्यात आले नव्हते. गोळीबार करण्यामागे त्याचा काय उद्देश होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हल्लेखोर पीडितांना ओळखत होता की नाही याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी इंग्लंडमधल्या मँचेस्टर अरिनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला होता. आमच्या एका "सैनिका"ने हा हल्ला केल्याचं इसिसनं जाहीर करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मँचेस्टरच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा भीषण हल्ला झाला आहे, असं वक्तव्य ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी केलं होतं.
मँचेस्टर अरिनामधील दहशतवादी हल्ल्याच्या वृत्तानंतर इसिसच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला होता. याचा एक व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. "इराकमधील हवाई हल्ल्यांचा बदला म्हणून हा हल्ला केला", असा दावाही केला जात आहे. मवारी रात्री इंग्लंडच्या मँचेस्टर शहरात झालेल्या अरियाना ग्रँडच्या पॉप कॉन्सर्टमध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला होता. तर 59 जण जखमी झाले. या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.