८० टक्के भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खूश, पीइडब्ल्यूच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 01:34 AM2023-08-31T01:34:12+5:302023-08-31T06:33:53+5:30
दिल्लीत ९ व १० सप्टेंबर रोजी होत असलेल्या जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले.
वॉशिंग्टन : भारतातील ८० टक्के नागरिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अनुकूल मत आहे. तर अलीकडच्या काळात भारत हा अधिक प्रभावशाली देश झाला असल्याचे दर दहापैकी सात भारतीयांचे मत आहे, असा निष्कर्ष पीइडब्ल्यू रिसर्च सेंटरने केलेल्या एका सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.
दिल्लीत ९ व १० सप्टेंबर रोजी होत असलेल्या जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. भारताबद्दल जगभरात सकारात्मक प्रतिक्रिया आहे असे या सर्वेक्षणातून दिसून आले. ४६ टक्के लोकांनी भारताबद्दल अनुकूल तर ३४ टक्के लोकांनी प्रतिकूल मत व्यक्त केले. तर १६ टक्के लोकांनी मतप्रदर्शन करण्यास नकार दिला.
पीइडब्ल्यू या संस्थेने २० फेब्रुवारी ते २२ मे या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणात २४ देशांतील ३०,८६१ जण सहभागी झाले. त्यात भारतातील २६११ नागरिकांचा समावेश होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत हा महाशक्ती बनण्याची शक्यता कितपत आहे तसेच भारतीयांना इतर देशांबद्दल काय वाटते, या गोष्टींबाबत सदर सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आले होते.
मोदी यांची लोकप्रियता कायम : भाजप
पीइडब्ल्यूच्या सर्वेक्षणातील निष्कर्षांबद्दल भाजपने म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम आहे. भारताचा जागतिक स्तरावरील प्रभाव वाढत आहे असे भारतातील सर्वाधिक लोकांना तसेच साऱ्या जगालाही वाटते. पीइडब्ल्यूच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष हा त्याचा पुरावा आहे.
१० पैकी ७ भारतीयांना वाटते की, भारत झाला आहे अधिक प्रभावशाली देश.
१० पैकी ८ भारतीयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी अनुकूल मत
७१%
इस्रायली नागरिकांचा
भारताविषयी सकारात्मक दृष्टिकोन असल्याचे अहवालात म्हटले आहे.
४९% भारतीयांना
वाटते की अमेरिकेचा प्रभाव वाढला आहे
४१% भारतीयांना
वाटते की रशियाचा प्रभाव वाढला आहे.