आता बास...82 वर्षांचा माणूस अखेर 66 वर्षांनी कापणार नखे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 02:45 PM2018-07-11T14:45:04+5:302018-07-11T17:34:19+5:30
श्रीधर चिल्लाल असं या गृहस्थांचं नाव असून त्यांचं वय 82 वर्षे इतकं आहे. त्यांनी 66 वर्षे नखे वाढवली असून जगातील सर्वात लांब नखांचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
न्यू यॉर्क- अरे किती नखं वाढवलीस... कोणाला तरी लागतील असा ओरडा तुम्ही अनेकदा खाल्ला असेल पण भारतीय वंशाच्या एका व्यक्तीने गेली 66 वर्षे नखे कापलेली नाहीत. आता मात्र त्यांनी नखं कापण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीधर चिल्लाल असं या गृहस्थांचं नाव असून त्यांचं वय 82 वर्षे इतकं आहे. त्यांनी 66 वर्षे नखे वाढवली असून जगातील सर्वात लांब नखांचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
चिल्लाल यांचे नाव गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे, त्यांनी 1952 साली नखे कापणं सोडून दिलं होतं. आता साडेसहा दशकांच्या काळानंतर त्यांनी नखं कापण्याचा निर्णय घेतला आहे. न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर येथे ते नखे कापणार असून त्यासाठी एका जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या सर्व नखांची एकूण लांबी 909.6 सें.मी असावी. त्यांच्या अंगठ्याचे नख सर्वात लांब असून ते 197.8 सें.मी इतके आहे. 2016 मध्ये " एकाच हाताची सर्वात लांब वाढलेली नखे" अशा उल्लेखासह त्यांचे नाव गिनिज बूकात नोंदले गेले.
चिल्लाल हे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांना रिप्लेज संग्रहालयातर्फे नखे कापण्याची विनंती करण्यात आली असून ती कापल्यानंतर संग्रहालयात ठेवण्यात येतील. चिल्लाल हे सध्या त्यासाठीच अमेरिकेत गेले आहेत.