संयुक्त राष्ट्रांच्या तब्बल 86 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, जगभरातील आकडा 6,00,000च्या जवळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 03:52 PM2020-03-28T15:52:40+5:302020-03-28T16:01:48+5:30
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे अधिकांश कर्मचारी घरूनच काम करत आहेत. न्यूयॉर्क येथील आमच्या मुख्यालयात कर्मचारी रोज 11 हजार वेळा स्वाइप करतात. मात्र शुक्रवारी हा आकडा 140वर आला.
संयुक्त राष्ट्र - जगभरात संयुक्त राष्ट्रांच्या एकूण 86 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समते. संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, युरोपात संयुक्त राष्ट्रांच्या सर्वाधिक सदस्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे.
दुजारीक म्हणाले, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे अधिकांश कर्मचारी घरूनच काम करत आहेत. न्यूयॉर्क येथील आमच्या मुख्यालयात कर्मचारी रोज 11 हजार वेळा स्वाइप करतात. मात्र शुक्रवारी हा आकडा 140वर आला. ते म्हणाले, जिनेव्हामध्ये गुरुवारी कर्मचाऱ्यांची संख्या 4 हजारहून 70वर आली आहे.
व्हियेनामध्ये संयुक्त राष्ट्रांचे 97 टक्के कर्मचारी घरूनच काम करत आहेत. तर अदीस अबाबा आणि इथियोपियामध्ये 99 टक्के कर्मचारी घरूनच काम करत आहेत.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यत 27,370 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास 6,00,000 जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 1,33,373 लोक बरे झाल्याची माहिती आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. तेथे आतापर्यंत तब्बल 9134 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय चीनमध्ये 3295, अमेरिकेत 1704, स्पेनमध्ये 5138, इराणमध्ये 2378, फ्रान्समध्ये 1995 आणि जर्मनीमध्ये 391 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात आतापर्यंत 20 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.