खास प्लॅन...! भारत-बांगलादेशमधील कटुता दूर होणार? होऊ शकते जयशंकर-मोहम्मद तौहिद हुसेन यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 19:57 IST2025-02-10T19:56:40+5:302025-02-10T19:57:42+5:30
जर तौहीद हुसेन आणि एस जयशंकर यांची नियोजित बैठक झाली, तर पाच महिन्यांतील ही त्यांची दुसरी बैठक असेल...

खास प्लॅन...! भारत-बांगलादेशमधील कटुता दूर होणार? होऊ शकते जयशंकर-मोहम्मद तौहिद हुसेन यांची भेट
बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन पुढील आठवड्यात ओमानची राजधानी असलेल्या मस्कट येथे आयोजित हिंद महासागर परिषदेदरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेऊ शकतात. बांगलादेश, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये आणखी तणाव वाढू नये या उद्देशाने, एक संदेश देण्यासाठी या बैठकीचा वापर करू शकतो.
8 वी हिंद महासागर परिषद (आयओसी 2025) 16-17 फेब्रुवारीला मस्कट येथ होत आहे. भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी गेल्या महिन्यात बांगलादेशच्या परराष्ट्र सल्लागारांना परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. जर तौहीद हुसेन आणि एस जयशंकर यांची नियोजित बैठक झाली, तर पाच महिन्यांतील ही त्यांची दुसरी बैठक असेल.
यापूर्वी सप्टेंबर महिन्यात झाली होती बैठक -
यापूर्वी, तौहीद हुसेन आणि एस जयशंकर यांची बैठक गेल्या वर्षी सप्टेंबरमहिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या सत्रादरम्यान न्यूयॉर्क येथे झाली होती. बांगलादेशात विद्यार्थी आणि जनतेने केलेल्या उठावामुळे ५ ऑगस्टला शेख हसीना यांचे अवामी लीग सरकार कोसळले होते. यानंतर,ची ही चर्चा परस्पर हितांच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय संबंध पुढे नेण्यासंदर्भात झाली होती.
भारतीय परराष्ट्र सचिवांनी केला होता बांगलादेश दौरा -
न्यू यॉर्क येथील चर्चेनंतर, भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ढाका दौरा केला होता. यावेळी त्यांनी बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मोहम्मद जसीम उद्दीन यांची भेट घेतली होती. याशिवाय त्यांनी, बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस, परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन आणि लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांचीही भेट घेतली. तेव्हा दोन्ही देशांत संबंध सामान्य करण्यासंदर्भात आणि ऑगस्टनंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. महत्वाचे म्हणजे, बांगलादेशातील सत्तापालटानंतर शेख हसीना देखील भारतात आहेत. यामुळेही दोन्ही देशांचे संबंध बिघडलेले आहेत. बांगलादेशने अनेक वेळा त्यांना परत पाठविण्याची मागणी केली आहे.