न्यूयॉर्कमधील ९-११ म्युझियम जनतेसाठी खुले
By admin | Published: May 23, 2014 12:40 AM2014-05-23T00:40:58+5:302014-05-23T00:40:58+5:30
न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील ९-११ च्या हल्ल्यानंतर त्याच जागी उभारलेले वस्तुसंग्रहालय बुधवारपासून सर्वसामान्य जनतेसाठी खुले झाले आहे
न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील ९-११ च्या हल्ल्यानंतर त्याच जागी उभारलेले वस्तुसंग्रहालय बुधवारपासून सर्वसामान्य जनतेसाठी खुले झाले आहे. या वस्तुसंग्रहालयात हल्ल्यात बळी पडलेल्या लोकांच्या स्मृती असून, ते पाहणारे लोक भावुक होत आहेत. सप्टेंबर ११ स्मृती संग्रहालय असे त्याचे नाव असून, ते न्यूयॉर्कच्या मॅनहटन भागात आहे. हल्ला व त्यात बळी पडलेल्या ३ हजार लोकांच्या स्मृती म्हणून त्यांच्याशी संबंधित वस्तू या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. आठ वर्षांनंतर हे वस्तुसंग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. हे वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी जवळच्या विमा कंपनीतील अलीसन स्लेटरी दुपारच्या सुटीत तिथे गेली. हल्ल्यात मरण पावलेले काही लोक तिला माहीत होते. त्यांच्याशी संबंधित काही माहिती मिळते का हे पाहण्यासाठी ती गेली; पण परत येताना ती दु:खाने खचली होती. परत मी तो अनुभव घेणार नाही असे तिने म्हटले आहे; पण या वस्तुसंग्रहालयाची रचना अत्यंत सुंदर आहे, असेही त्यांनी मान्य केले. वस्तुसंग्रहालयात मांडण्यासाठी अनेक वस्तू होत्या. अग्निशमन दलाचे मोडलेले ट्रक, पोलादाच्या वितळलेल्या वस्तू, रक्ताचे डाग पडलेले बूट, पैशाची पाकीट आणि लिपस्टिकच्या कांड्या यांचा खच होता. मायकेल कॉटन (४३) हे या इमारतीचे वास्तुशिल्पज्ञ आहेत. स्रोहेटा कंपनीत काम करणार्या कॉटन यांनी इमारतीचा काचेचा घुमट डिझाईन केला आहे. या इमारतीत प्रवेश करताना हवा आणि प्रकाश असणार्या जागेतून आपण आत जातो; पण बाहेर पडताना मात्र अंधार वाटतो, असे त्यांनी सांगितले. या इमारतीत रेकॉर्ड केलेले संवादही मनाला हात घालणारे आहेत. पहिल्या दिवशी या वस्तुसंग्रहालयात मोफत प्रवेश होता.