"मी चॉकलेट न खाल्ल्यानं फरक पडत नाही, पण..."; चिमुकल्यानं तुर्की भूकंपग्रस्तांसाठी फोडला गुल्लक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 09:31 AM2023-02-08T09:31:04+5:302023-02-08T09:33:05+5:30
तुर्की आणि सीरियातील विनाशकारी भूकंपानं हजारोंचा बळी गेला आहे. मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण या प्रलयानं संपूर्ण जग सुन्न झालं आहे.
तुर्की आणि सीरियातील विनाशकारी भूकंपानं हजारोंचा बळी गेला आहे. मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण या प्रलयानं संपूर्ण जग सुन्न झालं आहे. अजूनही हजारो लोक ढिगाऱ्याखाली अडकून पडले आहेत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिला, वृद्ध आणि लहान मुलांचे डोळ्यात पाणी आणणारे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. जगातील बहुतेक देश तुर्की आणि सीरियाच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. यात एका ९ वर्षांच्या चिमुकल्यानं मन जिंकणारं काम केलं आहे.
अवघ्या ९ वर्षांचा चिमुकला गेल्या वर्षी आलेल्या भूकंपात बचावला होता. त्यानं यावेळीच्या भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी आपला गुल्लक फोडण्याचा निर्णय घेतला. वर्षभर साठवलेले सर्व पैसे आपल्याला भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी द्यायचे आहेत असं त्यानं पालकांना सांगितलं आणि त्यांचंही मन भरून आलं. चिमुकल्यानं केलेली ही मदत कदाचित मोठी नसेलही पण त्यानं दाखवलेला संवेदनशीलपणा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.
गेल्यावर्षीच्या भूकंपात बचावला होता चिमुकला
गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात तुर्कीत उत्तर-पश्चिमी डुजसे प्रांतात आलेल्या ५.९ रिश्टर स्केलच्या भूकंपात अल्परसलान एफे डेमीर या चिमुकल्याला एका तंबूत राहण्यास भाग पडलं. आता पुन्हा एकदा तु्र्कीत आलेल्या भूकंपाची बातमी त्यानं टेलिव्हिजनवर पाहिली आणि त्याला वर्षभरापूर्वीची घटना आठवली.
गुल्लक फोडून भूकंपग्रस्तांसाठी लिहिलं पत्र
हजारो लोकांच्या डोळ्यात अश्रू असताना आज चिमुकल्यानं संवेदनशीलपणा दाखवत आपल्या आईकडे गुल्लकमधील पैसे भूकंपग्रस्तांना देण्याची इच्छा असल्याचं म्हटलं. यानंतर त्याच्या पालकांनी तुर्कीच्या रेड क्रीसेंटमधील ड्यूज शाखा गाठली आणि मदत अधिकाऱ्यांकडे गुल्लक सुपूर्द केला. चिमुकल्यानं भूकंपग्रस्तांसाठी एक पत्र देखील लिहिलं आहे.
चॉकलेट नाही मिळालं तरी चालेल पण...
"ज्यावेळी डुझसेमध्ये भूकंप आला होता तेव्हा मी खूप घाबरलो होतो. आता पुन्हा एकदा जेव्हा भूकंपाची बातमी पाहिली आणि धडकी भरली. आई-बाबांनी दिलेली पॉकेट मनी मी आता भूकंपग्रस्तांना देण्याचं ठरवलं. मला चॉकलेट खरेदी करता नाही आलं तरी चालेल पण भूकंपग्रस्त भागातील लहान मुलांना मदत होणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी मला माझे कपडे आणि खेळणी सुद्धा पाठवायची आहेत", असं तो ९ वर्षांचा चिमुकला म्हणाला.
तुर्की-सीरियातील मृत्यूंचा आकडा ८ हजारावर
तुर्की आणि सीरियात आलेल्या विनाशकारी भूकंपातील मृत्यूमुखींचा आकडा आता ८ हजाराच्या वर पोहोचला आहे. तर अजूनही हजारो जण इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडलेले असल्याचा अंदाज आहे. सध्या दिवसरात्र बचावकार्य वेगानं सुरू आहे. भूकंपात जवळपास ५ हजाराहून अधिक इमारती कोसळल्या असल्याची माहिती आहे. आतापर्यंत ८ हजाराहून अधिक जणांना सुखरुप बाहेर देखील काढण्यात आलं आहे.