चीनमध्ये २४ तासांत ९,००० मृत्यू! भयावह स्थिती; अंत्यसंस्कारासाठी रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 06:34 AM2022-12-31T06:34:38+5:302022-12-31T06:35:08+5:30
कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती बिकट झाली आहे. चीनमध्ये संसर्गामुळे दररोज ९,००० मृत्यू होत आहेत.
बिजींग: कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती बिकट झाली आहे. चीनमध्ये संसर्गामुळे दररोज ९,००० मृत्यू होत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा आकडा जवळपास दुप्पट आहे, असे लंडन येथील ग्लोबल हेल्थ इंटेलिजन्स कंपनी ‘एअरफिनिटी’ने सांगितले. दरम्यान, अमेरिका, तैवान, जपान, भारत, इटली, दक्षिण कोरिया, पाकिस्तान आणि मलेशियाने कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक असणाऱ्या व लसीकरण झालेल्या चिनी प्रवाशांनाच देशात प्रवेश देण्याचे धोरण स्वीकारले आहे.
कोरोनामुळे नवीन प्रकारांचा मागोवा घेण्यासाठी अमेरिकेने वेगळा मार्ग चोखाळला आहे. अमेरिका आंतरराष्ट्रीय उड्डाणांतील सांडपाण्याचे नमुने घेऊन त्यातील विषाणूंची तपासणी करणार आहे. इटलीने युरोपियन (ईयू) देशांना चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अनेक देशांनी त्याला नकार दिला आहे.
मृतदेहांचा ढीगही
चीन आणि चिनी कम्युनिस्ट पक्षावर लक्ष ठेवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनी काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. यामध्ये स्मशानभूमीत लोकांची रांग दिसून येत आहे. मृतदेहांचा ढीगही येथे पाहायला मिळतो. शांघायमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. रात्री तीनपासून येथील स्मशानभूमीसमोर रांग लागलेली असते.
अधिक मृत्युंमुळे दहशत
जपानने शुक्रवारपासून चीनमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करणे सुरू केले आहे. देशातील कोरोना रुग्ण व बळींची वाढती संख्या तसेच चीनमधील वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"