9/11 हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं ओबामांना पत्र, सांगितलं हल्ल्याचं कारण
By admin | Published: February 9, 2017 12:17 PM2017-02-09T12:17:53+5:302017-02-09T13:38:05+5:30
न्यायालयाने आम्हाला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा जरी सुनावली तरी आम्हाला काही फरक पडत नाही असंही त्याने पत्रात लिहिलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 9 - अमेरिकेत 11 सप्टेंबर 2011 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आरोपीने माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ग्वांतानामो कारागृहातून पत्र लिहिलं आहे. आपण 9/11 दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाईंड असल्याचा दावा या आरोपीने केला आहे. अमेरिकेवर करण्यात आलेला हल्ला हा परराष्ट्र नितीवरील 'नैसर्गिक प्रतिक्रिया' असल्याचं सांगत हल्ला योग्य ठरवण्याचा प्रयत्न पत्रातून करण्यात आला आहे. अपहरणाचा कट रचल्याप्रकरणी खटला चालवला जात असलेल्या पाच आरोपींमधील एक असलेल्या खालिद शेख मोहम्मद याने हे पत्र लिहिलं आहे. बुधवारी हे पत्र जारी करण्यात आलं. 'न्यायालयाने आम्हाला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा जरी सुनावली तरी आम्हाला काही फरक पडत नाही', असंही त्याने पत्रात लिहिलं आहे.
'जर न्यायालयाने आम्हाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर आमच्यासाठी ही आनंदाची बाब असेल. यामुळे आम्हाला आमच्या सर्व पापांसाठी पश्चात्ताप करण्याचा तसंच आयुष्यभर आमच्या अल्लाहची सेवा करण्याची संधी मिळेल', असं मोहम्मदने पत्रात लिहिलं आहे. 'जर तुमच्या न्यायालयाने मृत्यूची शिक्षा दिली तरी तो मला अल्लाह आणि पैगंबरसोबत ओसामा बिन लादेन आणि ज्यांची तुम्ही हत्या केली त्या मित्रांची भेट घेण्याची संधी मिळेल', असंही मोहम्मदने पत्रात लिहिलं आहे. मोहम्मदला 2015 मध्येच हे पत्र पाठवायचं होतं, पण कारागृह अधिका-यांनी परवानगी नाकारली होती.
या मुद्यावर युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने गेल्याच महिन्यात हे पत्र पाठवण्याची परवानगी दिली होती. विशेष म्हणजे याचदरम्यान ओबामांचा कार्यकाळ संपत आला होता. मोहम्मदने पत्रात लिहिलं आहे की, 'वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कमध्ये झालेले दहशतवादी हल्ले इस्लामला नष्ट करणा-या अमेरिकेच्या धोरणांवरील नैसर्गिक प्रतिक्रियेचा भाग होते'. मोहम्मद आणि त्याचे साथीदार विमान अपहरण, दहशतवाद आणि तीन हजार हत्यांच्या प्रकरणात आरोपी आहेत.