टाटा समूहाला अमेरिकेत ठोठावला 94 कोटी डॉलरचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2016 11:59 AM2016-04-17T11:59:16+5:302016-04-17T14:43:05+5:30
टाट समूहाच्या दोन कंपन्यांना अमेरिकेच्या ट्रेड सिक्रेट लॉसूटच्या खटल्यात 94 कोटी डॉलर म्हणजेच 6200 कोटी रुपयांचा दंड ग्रँड ज्युरीनं ठोठावला आहे.
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १७- टाटा समूहाच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(टीसीएस), टाटा इंटरनॅशनल अमेरिकन कॉर्प या दोन कंपन्यांना अमेरिकेच्या ट्रेड सिक्रेट लॉसूटच्या खटल्यात 94 कोटी डॉलर म्हणजेच 6200 कोटी रुपयांचा दंड ग्रँड ज्युरीनं ठोठावला आहे. अमेरिकेतल्या एपिक सिस्टम्सनं दाखल केलेल्या खटल्यात हा दंड ठोठावण्यात आला आहे.
टाटा समूहाच्या दोन्ही कंपन्यांना एपिक सिस्टीम्सच्या सॉफ्टवेअरची चोरी केल्याच्या आरोपाखाली 24 कोटी डॉलरची नुकसानभरपाई आणि 70 कोटी डॉलरचे दंडात्मक नुकसान देण्याचा आदेश ग्रँड ज्युरीनं दिला आहे. ऑक्टोबर 2014 मध्ये एपिक सिस्टम्सने टाटा समूहाच्या कंपन्यांविरोधात एपिकचे ट्रेड सिक्रेट्स, गोपनीय माहिती, कागदपत्रे आणि डेटा चोरल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता.
कंपनीने ग्राहकाचे सल्लागार सेवा देताना हा डेटा चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. टीसीएसच्या कर्मचाऱ्यांनी सल्लागार करारासाठी आवश्यक असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात एपिकच्या सॉफ्टवेअरचा वापर करुन आपले उत्पादन उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, असे एपिक सिस्टीम्सने म्हटले होते. त्यामुळे अमेरिकेत टाटा समूहाला हा मोठा दणका मानण्यात येतो आहे.