९५ वर्षीय आजींनी हादरवलं ऑस्ट्रेलियन सरकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 12:22 PM2023-05-27T12:22:09+5:302023-05-27T12:22:22+5:30

काही दिवसांपूर्वी याच म्हाताऱ्या, ९५ वर्षांच्या आजीच्या हाती कुठूनसा एक चाकू आला. हा चाकू घेऊन आपल्या वॉकिंग फ्रेमच्या मदतीनं ती थोडंसं चालत होती.

95-year-old grandmother shook the Australian government! | ९५ वर्षीय आजींनी हादरवलं ऑस्ट्रेलियन सरकार!

९५ वर्षीय आजींनी हादरवलं ऑस्ट्रेलियन सरकार!

googlenewsNext

‘ढेकूण मारण्यासाठी बॉम्ब कशाला पाहिजे?’ असं म्हटलं जातं. म्हणजे एखादी छोटी गोष्ट करण्यासाठी फार मोठा लवाजमा नेण्याची, फार तयारी करण्याची आवश्यकता नसते! पण आजकाल अनेक गोष्टींसाठी अतिरेक केला जातो. त्याचा गाजावाजा केला जातो आणि बऱ्याचदा डोंगर पोखरून उंदीर काढला जातो! 
त्याचंच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियात घडलेली एक घटना! 

क्लेअर नॉलेंड ही ९५ वर्षांची एक आजी. तिला चालता येत नाही. नीट हालचाल करता येत नाही. ऐकायला येत नाही. जीवनावश्यक गोष्टीही तिला स्वत:च्या स्वत: करता येत नाहीत. अनेक लहानसहान गोष्टींसाठीही तिला इतरांवर अवलंबून राहावं लागतं. थोडंफार कुठे जायचं असलं, तर वॉकिंग फ्रेमचा आधार घेऊन कसंबसं काही पावलं ती चालू शकते. भरीस भर म्हणून क्लेअर आजीला गेल्या कित्येक वर्षांपासून स्मृतिभ्रंशाचा त्रास आहे. ती लोकांना  ओळखू शकत नाही. थोड्या वेळापूर्वी आपण काय केलं होतं, आपण काय बोललो होताे, बोलत आहोत हेही तिला आठवत नाही. इतक्या साऱ्या अडचणी असल्यामुळेच तिला दक्षिणपूर्व ऑस्ट्रेलियातील कूमा या शहरातील एका नर्सिंग होममध्ये ठेवण्यात आलं आहे. जेणेकरून तिथे तिची थोडी काळजी घेतली जाईल आणि तिथल्या नर्सेस, सहायकांच्या मदतीनं तिला आपलं पुढचं आयुष्य कसंबसं काढता येईल! 

काही दिवसांपूर्वी याच म्हाताऱ्या, ९५ वर्षांच्या आजीच्या हाती कुठूनसा एक चाकू आला. हा चाकू घेऊन आपल्या वॉकिंग फ्रेमच्या मदतीनं ती थोडंसं चालत होती. जिला धड चालताही येत नाही, तिच्या हातापायात त्राण नाही, ती आपल्या हातात चाकू घेऊन असा कोणाचा खून पाडणार होती? पण तिच्या हाती चाकू पाहून कोणी तरी पोलिसांना कळवलं. पोलिस लगेच आपला ताफा घेऊन नर्सिंग होमच्या आवारात दाखल झाले. त्यांनी क्लेअर आजीला लांबूनच ‘आदेश’ दिला, जिथे असेल तिथेच थांब. पुढे सरकू नकोस.. तरीही क्लेअर आजी खुरडत खुरडत चालतच होती. 

तिच्या थरथरत्या हातात वॉकिंग फ्रेम आणि तो चाकूही तसाच होता! क्लेअर आजी आपली ऑर्डर ऐकत नाही, चाकू घेऊन ती तशीच आपल्या दिशेनं पुढे येतेय म्हणून पोलिसांनी काय करावं? त्यांनी लगेच तिच्यावर ‘टेजर गन’ चालवली! टेजर गन म्हणजे ही एक अशा प्रकारची गन असते, ज्यामुळे समोरच्या आरोपी, गुंड किंवा आंदोलकाला ‘विजेचा’ एक जोरदार शॉक (करंट) बसतो. त्यामुळे तो थोडा वेळ निश्चल होताे, त्या झटक्यानं तो थोडा बधिर होतो. तेवढ्या काळात त्याला ताब्यात घेता येतं किंवा एखादी धोकादायक घटना टाळता येऊ शकते. पण क्लेअर आजीकडून तर अशा प्रकारचा कोणताही धोका कोणालाही शक्य नव्हता. तरी तिच्यावरही टेजर गन चालवण्यात आली. अर्थातच, या गनचा झटका क्लेअर आजीला सहन झाला नाही आणि ती उभ्या उभ्या खाली कोसळली. कवटी फ्रॅक्चर झाल्यानं तिच्या मेंदूला मोठा मार लागला. खाली पडल्याक्षणी ती कोमात गेली आणि नंतर आठवडाभरातच तिचा मृत्यू झाला!

म्हटलं तर ही अगदी छोटीशी घटना. पण त्यामुळे ऑस्ट्रेलियन पोलिसांची मानसिकता आणि त्यांची ‘क्रूरता’ जगासमोर आली. याच कारणानं ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांना आता जगभरातून टीका सहन करावी लागते आहे. एका निरपराध म्हातारीला मारून त्यांनी एवढी मोठी काय फुशारकी गाजवली, यावरून त्यांना धारेवर धरलं जात आहे. क्लेअर आजीच्या हातात चाकू असल्यानं आणि ती आमच्यावर हल्ला करण्याच्या भीतीमुळेच आम्ही तिच्यावर ‘गोळीबार’ केला, असं सांगणाऱ्या पोलिसांना तर नेटिझन्सनी ‘सलाम’ ठोकला आहे! यामुळे ऑस्ट्रेलियाची जगभरात नाचक्की होत आहे. सोशल मीडियावर तर याबाबत मीम्स आणि ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या ‘बहादुरी’चे किस्से रंगवून सांगितले जात आहेत. या घटनेमुळे एक मात्र झालं. आता कोणत्याही क्षुल्लक कारणासाठी घातक हत्यारांचा वापर न करण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला आहे. अशा पोलिसांना आता अटकही केली जाणार आहे. एकंदर या म्हातारीमुळे अख्खं ऑस्ट्रेलियन सरकार हादरलं आहे..

कृष्णवर्णीयांना ‘धडा’?
अमेरिकेतही पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात टेजर गनचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वीच लॉस एंजेलिस येथे एक कृष्णवर्णीय ‘गुन्हेगार’ किनन ॲण्डरसनला पकडण्यासाठी पोलिस आले. त्यानं अटकेला विरोध करताच त्याच्यावर टेजर गन चालवण्यात आली. त्या गनच्या करंटमुळे किननला हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला! विशेषत: कृष्णवर्णीय लोकांना ‘धडा’ शिकवण्यासाठी या गनचा वापर केला जातो, असे आरोप अमेरिकन पोलिसांवर होत आहेत!

Web Title: 95-year-old grandmother shook the Australian government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.