बालकामुळे थांबले १० महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध; 'असा' झाला चमत्कार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 06:11 AM2024-08-31T06:11:31+5:302024-08-31T06:11:57+5:30
१० महिन्यांच्या बालकाला पाेलिओ झाल्याचे निदान, लसीकरणासाठी डब्ल्यूएचओची विनंती मान्य.
तेल अविव/ गाझा शहर : इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या १० महिन्यांपासून भीषण युद्ध सुरू आहे. त्यात आतापर्यंत दाेन्ही बाजूचे मिळून ४० हजारांपेक्षा जास्त लाेकांचा मृत्यू झाला आहे. जगाचे टेन्शन वाढविणारे युद्ध थांबविण्यासाठी चर्चेच्या फेऱ्यादेखील निष्फळ ठरल्या आहेत. मात्र, आता दाेन्ही बाजूंनी ३ दिवसांसाठी युद्ध थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. एका १० महिन्यांच्या मुलाला पाेलिओ झाल्याचे निदान झाल्यानंतर संपूर्ण गाझापट्टीमध्ये पाेलिओ लसीकरणासाठी युद्ध थांबविण्यात आले आहे.
गेल्या १० महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध एका १० महिन्यांच्या मुलामुळे तात्पुरते का हाेईना थांबले आहे. अब्दुल रहमान याला टाईट २ पाेलिओ विषाणूच्या संसर्गामुळे ताे अपंग झाला. २३ ऑगस्ट राेजी जागतिक आराेग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) याची खात्री पटविली. २५ वर्षांनंतर गाझामध्ये पोलिओचा हा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता डब्ल्यूएचओने या भागात पाेलिओ लसीकरण माेहीम राबवावी लागणार असून त्यासाठी युद्ध थांबविणे आवश्यक असल्याचे म्हटले हाेते.
कशी राबविणार लसीकरण माेहीम?
गाझामध्ये ३ वेगवेगळ्या विभागांमध्ये माेहीम राबविण्यात येणार आहे. मध्य गाझा येथून माेहिमेला सुरुवात हाेईल. त्यानंतर दक्षिण गाझा आणि उत्तर गाझामध्ये लसीकरण करण्यात येईल. गरज भासल्यास चाैथ्या दिवशीही युद्धविराम करण्याबाबत इस्रायल आणि हमासमध्ये करार झाला आहे.
६,५०,००० बालकांना तीन दिवसांमध्ये लस देण्यात येणार आहे.
रविवारपासून लसीकरणास सुरुवात हाेणार आहे.
सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राबविणार मोहीम.
१२.६ लाख ताेंडावाटे देणाऱ्या पाेलिओ लसीचे डाेस पाठविण्यात आले आहेत.
२ हजार आराेग्य सेवकांची मदत घेण्यात येणार आहे.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी युद्ध सुरू झाले होते.
२३ लाख नागरिक आतापर्यंत विस्थापित झाले आहेत.