ऑफिस वेळेत रोज ६-६ तासांचा ‘टॉयलेट ब्रेक’; कर्मचाऱ्याला कंपनीपाठोपाठ कोर्टाचाही दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 08:04 AM2023-06-05T08:04:20+5:302023-06-05T08:09:26+5:30
एका शिफ्टमध्ये दोन ते तीनवेळा शौचालयाचा वापर केला. एकूण २२ वेळेस किमान ४७ मिनिटे ते ३ तास शौचालयात घालविले.
चीनमधील एका व्यक्तीला ऑफिसमध्ये कामाच्या वेळेत दररोज सहा तास शौचालयात घालविल्याबद्दल काढून टाकण्यात आले. कर्मचाऱ्याने वैद्यकीय कारणाचा हवाला देत अन्यायकारकपणे कामावरून काढल्याबद्दल कायदेशीर कारवाईसाठी कोर्टात धाव घेतली. पण, अलीकडेच न्यायालयानेही त्याच्याविरोधात निर्णय दिला.
वांग आडनावाचा हा कर्मचारी २००६ मध्ये कंपनीत रुजू झाला. २०१४ मध्ये त्याच्या ‘गुदद्वाराच्या समस्येवर’ उपचार झाले, ज्यामुळे त्याला वारंवार शौचालयात जावे लागायचे. उपचारानंतरही वेदना होत असल्याचे सांगत तो २०१५ पर्यंत रोज ३ ते ६ तास शौचालयात घालवायचा.
कंपनीच्या नोंदीनुसार, २०१५ मध्ये ७ ते १७ सप्टेंबर दरम्यान त्याने एका शिफ्टमध्ये दोन ते तीनवेळा शौचालयाचा वापर केला. या दरम्यान त्याने एकूण २२ वेळेस किमान ४७ मिनिटे ते ३ तास शौचालयात घालविले. त्यानंतर २३ सप्टेंबर २०१५ रोजी कंपनीने त्याला नोकरीवरून काढले. याविरोधात तो कोर्टात गेला. पण, अलीकडेच कोर्टाने शौचालयात त्याचा प्रदीर्घ दैनंदिन मुक्काम वाजवी शारीरिक गरजांच्या पलीकडे असल्याचा निर्णय दिला तसेच हकालपट्टी कायदेशीर आणि न्याय्य असल्याचेही नमूद केल्याची बातमी समोर आली. लगेचच वृत्त व्हायरल झाले असून, नेटकरी मजेशीरपणे व्यक्त होत आहेत.