या मुस्लिम बहुल देशात बुरख्यावर बॅन; पुरुषांनी दाढी वाढविली तर पोलीसच कापून टाकतात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 04:11 PM2024-09-12T16:11:38+5:302024-09-12T16:13:14+5:30
३० वर्षांपासून सत्तेत असलेले राष्ट्रपती इमोमाली रहमान यांनी हे फर्मान काढले आहे. कारण...
एकीकडे भारतातील कर्नाटकमध्ये कॉलेजमधील बुरखा बंदीविरोधात राजकारण, कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्या झालेल्या असताना मुस्लिम बहुल देश ताजिकिस्तानमध्येच बुरखा बंदी करण्यात आली आहे. देशाच्या आर्थिक विकासासाठी धार्मिक ओळख अडथळा असल्याचे मत गेल्या ३० वर्षांपासून सत्तेत असलेले राष्ट्रपती इमोमाली रहमान यांचे बनले आहे. यामुळे त्यांनी पुरुषांच्या दाढी ठेवण्यावरही बंदी घातली आहे.
ताजिकिस्तानमध्ये याबाबत आदेश जारी झाले आहेत. रहमान हे आता त्यांच्या देशात पाश्चात्य जीवनशैली आणण्याची तयारी करत आहेत. देशाच्या सांस्कृतिक मुल्ल्यांची रक्षा करणे हा यामागचा उद्देश असून यामुळे अंधविश्वास आणि अतिरेकी विचारांविरोधात लढण्यास मदत होईल, असे सरकारचे म्हणणे आहे.
२०२० च्या जनगणनेनुसार ताजिकिस्तानात ९६ टक्के मुस्लिम आहेत. असे असले तरीही तेथील सरकार इस्लामी जीवनशैली आणि मुस्लिम म्हमून असलेली ओळख ही देशासमोरचे आव्हान असल्याचे मानत आहे. इमोमाली रहमान यांनी पुरुषांच्या दाढी वाढविण्यावर बंदी लादली आहे. असे केल्यास शिक्षा आणि जबर दंडाची तरतूद करण्यात आली आहे. दाढी वाढविलेली दिसल्यास पोलीस त्याला अडवून ती दाढी कापून टाकणार आहेत.
ताजिकिस्तानने २००७ पासून शाळा आणि २००९ पासून सरकारी कार्यालयांमध्ये बुरखा घालण्यास बंदी घातली होती. आता कोणतीही महिला तिचे डोके कोणत्याही कपड्याने किंवा बुरख्याने झाकू शकणार नाही. दाढी ठेवण्याचा कोणताही कायदा नाही, परंतू जबरदस्तीने ती कापली जात आहे.
जर एखाद्या व्यक्तीने असे काही केले तर सर्वसामान्यांना ६४,७७२ रुपये, कंपन्यांना २.९३ लाख रुपये आणि सरकारी अधिकाऱ्यांना ४ लाख ते ४,२८,३२५ रुपये दंड आकारला जाऊ शकतो. ताजिकिस्तान हा सुन्नी मुस्लिम बहुसंख्य देश आहे. इथे हिजाब आणि दाढी घालणे ही परदेशी संस्कृती मानली जाते. राजधानी दुशान्बे येथे दोन वर्षांपूर्वी काळ्या कपड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती.