बांगलादेशचे पंतप्रधान होताच मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 07:20 PM2024-08-28T19:20:05+5:302024-08-28T19:23:06+5:30
PM Muhammad Yunus: बांगलादेशातील हंगामी सरकारने एक मोठा निर्णय घेत जमात-ए-इस्लामी संघटनेला बंदीतून मुक्त केले आहे.
Muhammad Yunus Jamaat-e-Islami Party: शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर सत्तेत पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन झाले. नव्या सरकारने जमात-ए-इस्लामी या पक्षावरील बंदी हटवली आहे. हा बांगलादेशातील प्रमुख राजकीय पक्ष असून, त्याच्या शेख हसीना यांच्या सरकारने बंदी घातली होती.
जमात-ए-इस्लामी पक्षावरील बंदी हटवताना सरकारने म्हटले आहे की, जमात-ए-इस्लामी दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. दहशतवाद विरोधी कायद्याखाली या पक्षावर बंदी घालण्यात आलेली होती.
जमात-ए-इस्लामी पक्षावर बंदी का घालण्यात आली?
बांगलादेशात आरक्षणाविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला हिंसक वळण दिल्याचा आरोप जमात-ए-इस्लामी पक्षावर लावण्यात आला होता. त्यानंतर पक्षावर बंदी घातली गेली, पण शेवटी ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांना बांगलादेशातून पलायन करावे लागले होते.
पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बंदी हटवताना म्हटले आहे की, "जमात आणि त्यांचे सहयोगी दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे कोणतेही विशेष पुरावे मिळाले नाहीत. पक्षावर घातलेली बंदी अवैध, अन्याय करणारी आणि असंवैधानिक आहे."