मांजर दरवाजात बसू शकते; पण महिला नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 09:02 AM2024-10-02T09:02:09+5:302024-10-02T09:02:22+5:30

तालिबानचे प्रवक्ता हमदुल्ला फितरत यांनी म्हटलं आहे, जगभरात तालिबानला वाईट ठरवण्याची, आमच्याविरुद्ध दुष्प्रचार करण्याची कूटनीती खेळली जाते आहे.

A cat can sit in a doorway; But not women! | मांजर दरवाजात बसू शकते; पण महिला नाही!

मांजर दरवाजात बसू शकते; पण महिला नाही!

मांजर दरवाजात बसू शकते, आपल्या चेहऱ्यावर सूर्यप्रकाश घेऊन त्याचा आनंद घेऊ शकते, बागेत खारुताईच्या मागे ती पळू शकते, खारुताई झाडांवर मुक्तपणे तुरुतुरु फिरू शकते. कोणताही पक्षी फांदीवर बसून गाऊ शकतो; पण काबूलमध्ये, अफगाणिस्तानमध्ये महिला मात्र यातलं काहीही करू शकत नाही. अफगाणिस्तानात जे अधिकारी प्राणी, पक्षी, जनावरांना आहेत, तेवढेही अधिकार तिथल्या महिलांना नाहीत. तिचे हात-पाय-तोंड आणि तिचं स्वातंत्र्यच साखळदंडांनी करकचून बांधलेलं आहे. आपला चेहराही दाखवायला तिला मज्जाव आहे. ही कुठली स्थिती आहे?..

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत अभिनेत्री मेरील स्ट्रिपनं वरील शब्दांत नुकतेच तालिबानचे वाभाडे काढले. तालिबान्यांनी अफगाणिस्तानातील महिलांचा जिवंतपणी कसा नरक केला आहे, याचं अत्यंत विदारक वास्तव तिनं मांडलं. मेरील स्ट्रिप ही अमेरिकेची प्रतिभावान अभिनेत्री. आपला अभिनय आणि भाषेवरील प्रभुत्वामुळे अख्ख्या जगात तिचे चाहते आहेत. आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत चित्रपट आणि नाटकांत अनेक भूमिका तिनं अक्षरश: जिवंत केल्या. त्यामुळेच तब्बल तीन वेळा तिला ऑस्कर पुरस्कार मिळाला. कणखरपणा आणि स्पष्टवक्तेपणामुळे ती ओळखली जाते. 

मेरील स्ट्रिपच्या या टीकेनं तालिबानचा अक्षरश: तीळपापड झाला आहे. काय करू आणि काय नको, तिला खाऊ की गिळू असं झालं आहे. त्यामुळे तालिबाननं पलटवार करताना म्हटलं आहे, मेरील स्ट्रिपनं आमच्या देशाविषयी काही बोलण्यापेक्षा आपल्या देशाकडे पाहावं. तिथे काय चाललं आहे, अमेरिकेच्या महिलांना किती अधिकार आहेत, त्यांच्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाच्या उमेदवार महिलेलाही लैंगिक असमानतेला कसं सामोरं जावं लागतं, याकडे तिनं लक्ष द्यावं.. आमच्या देशात महिलांविषयी कोणताही भेदभाव केला जात नाही. त्यांना पुरेपूर स्वातंत्र्य आहे. अफगाणिस्तानात महिला बंदीवानाचं जीवन जगत नसून उलट मानवाधिकारांचं इथे रक्षणच केलं जातं. महिलांचा सन्मान इथे सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळेच महिलांच्या सुरक्षेची सर्वाधिक काळजी घेतली जाते. इथल्या महिलांकडे वाकड्या नजरेनं कुणीही बघू शकत नाही. दुर्दैवानं अनेक महिला तालिबानविरोधात दुष्प्रचार करतात.  

तालिबानचे प्रवक्ता हमदुल्ला फितरत यांनी म्हटलं आहे, जगभरात तालिबानला वाईट ठरवण्याची, आमच्याविरुद्ध दुष्प्रचार करण्याची कूटनीती खेळली जाते आहे. आम्ही हे कदापि सहन करणार नाही आणि अशा प्रत्येक गोष्टीचं प्रत्युत्तर दिलं जाईल. त्यामुळे कुणीही आमच्या नादी लागू नका. आम्ही स्वत:हून कुणाचं नाव घेत नाही, कुणाला त्रास देत नाही; पण आमची कळ काढण्याचा प्रयत्न कुणी केला तर त्याचीही गय आम्ही करत नाही.. त्यामुळे आमच्या देशात नाक खुपसण्यापेक्षा तुम्ही आपापली कामं करा, हेच बरं आहे, नाहीतर दुष्परिणामांना सज्ज राहा.

मेरील स्ट्रिपनं म्हटलं आहे, तालिबान प्रत्येकवेळी प्रत्येकाला धमक्या देऊन त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न करतो, हे किती दिवस चालणार? एक दिवस त्यांच्याच देशातील महिला आणि पुरुष तालिबानला संपवतील, त्यांच्याविरुद्ध एकजूट होऊन लढा देतील. असं झालं तर तालिबानला पळता भुई थोडी होईल. आताच त्याची सुरुवात झाली आहे. 

वैयक्तिक अधिकार आणि स्वातंत्र्याबाबत अफगाणिस्तानातील महिला सर्वाधिक वंचित आणि पीडित आहेत असं मानलं जातं; पण खरंच ही स्थिती पूर्वापार आहे? इतिहासात त्याचं उत्तर सापडतं. स्वीत्झर्लंडसारख्या आधुनिक देशातही महिलांना मतदानाचा अधिकार १९७१ मध्ये मिळाला. पण, अफगाणिस्तानच्या महिलांना १९१९ पासूनच मतदानाचा अधिकार मिळाला होता. अगदी अमेरिकन महिलांनाही त्यानंतर मतदानाचा अधिकार मिळाला. ७०च्या दशकातही अफगाणिस्तानमध्ये न्यायाधीश म्हणून महिला कर्तव्य बजावत होत्या, वकील म्हणून त्यांनी नाव कमावलं होतं. जवळपास प्रत्येक क्षेत्रात त्या नोकरी करीत होत्या, पण त्याच महिलांचे सारे अधिकार आता हिरावून घेण्यात आले आहेत. 

काहीच करायचं नाही, हेच ‘अधिकार’! 
अफगाणी महिलांना चारचौघांत बोलण्याची मनाई आहे. त्यांना गाणं म्हणण्यास प्रतिबंध आहे. मुली जास्तीत जास्त सहावीपर्यंत शिकू शकतात. त्यानंतर शिकण्यास आणि शाळेत जाण्यास त्यांना बंदी आहे. त्या नोकरी करू शकत नाहीत. त्या ड्रायव्हिंग करू शकत नाहीत. सोबत पुरुष असल्याशिवाय एकटीनं त्या कुठे जाऊ शकत नाहीत. बागेत बसू शकत नाहीत. मशिदीत जाण्यास त्यांना मनाई आहे. दुकानांच्या फलकांवर महिलांचा फोटो लावला तर मालकाला तुरुंगाची हवा खावी लागते..

Web Title: A cat can sit in a doorway; But not women!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.