एका कंपनीने चक्क ३३ देशांच्या निवडणुकांचा निकालच बदलला!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 09:00 AM2023-02-17T09:00:30+5:302023-02-17T09:00:59+5:30

इस्रायलच्या ‘टीम जॉर्ज’चा गुप्त तपासात पर्दाफाश; हॅकिंगची घेतली मदत

A company changed the results of the elections of 33 countries! | एका कंपनीने चक्क ३३ देशांच्या निवडणुकांचा निकालच बदलला!

एका कंपनीने चक्क ३३ देशांच्या निवडणुकांचा निकालच बदलला!

Next

लंडन : इंटरनेटच्या या युगात आता सर्व गोष्टी ऑनलाईन, डिजिटल होत आहेत. त्यापासून निवडणुका कशा दूर राहतील? भारतासह अनेक देशांत निवडणुका फिरविल्याचे आरोप विरोधक करीत असतात. अशा परिस्थितीत आता इस्रायलच्या एका कंत्राटदार कंपनीने तब्बल ३३ देशांच्या निवडणुकांत हॅकिंग, सोशल मीडियावर स्वयंचलित अपप्रचार करून निकाल फिरविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  

इस्रायलमधील ही कंपनी ५० वर्षीय टाल हनान या इस्रायली लष्करातील माजी अधिकारी चालवितो. त्यासाठी त्याने ‘जॉर्ज’ हे टोपणनाव धारण केले आहे. दोन दशकांहून अधिक काळापासून त्याची टीम विविध देशांचे निवडणूक निकाल फिरविण्याचे काम करीत आहे. त्याची टीम आता आफ्रिकेतील एका निवडणुकीचा निकाल फिरविण्याच्या मागे लागली आहे. दुसरा एक ग्रुप ग्रीसमध्ये, तर तिसरा अमिरातीमध्ये आहे. 

तपासांत काय उघड झाले?
तपासांत असाधारण तपशील उघड झाला आहे. टीम जॉर्जद्वारे चुकीची माहिती शस्त्र म्हणून कशी वापरली जाते, त्याचा कोणालाही मागमूस न लागता निवडणुकीत गुप्तपणे हस्तक्षेप करण्यासाठी कसा वापर केला जातो. हा ग्रुप कॉर्पोरेट क्लायंटसाठीही काम करतो.
हनानने गुप्त पत्रकारांना सांगितले की त्याच्या सेवांना ‘ब्लॅक ऑप्स’ म्हटले जाते. जनमत वळविण्याची इच्छा असलेल्या गुप्तचर संस्था, राजकीय मोहिमा आणि खासगी कंपन्यांसाठी त्याची सेवा उपलब्ध आहे. त्याची सेवा संपूर्ण आफ्रिका खंड, दक्षिण आणि मध्य अमेरिका, युरोपमध्ये सर्रास वापरल्या गेल्याचा दावाही त्याने केला आहे. 
जी मेल आणि टेलिग्राम खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी हॅकिंग तंत्राचा वापर करून प्रतिस्पर्ध्यांची माहिती जमविली जाते. त्या आधारे सोशल मीडियावर अपप्रचार करणाऱ्या बातम्या पसरविल्या जातात आणि सॉफ्टवेअरच्या (एम्स) मदतीने त्या व्हायरल केल्या जातात.

अपप्रचारासाठी सॉफ्टवेअर 
टीम जॉर्जच्या प्रमुख सेवांपैकी एक म्हणजे अत्याधुनिक सॉफ्टवेअर पॅकेज (एम्स). हे ट्विटर, लिंक्डइन, फेसबुक, टेलिग्राम, जी मेल, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर हजारो बनावट सोशल मीडिया प्रोफाइल नियंत्रित करू शकते. त्यातील काही प्रोफाईलकडे (अवतार) क्रेडिट कार्ड, बिटकॉइन वॉलेट्स आणि एअरबीएनबी खातीदेखील होती.
नेत्याला ॲमेझॉनवरून गिफ्ट
विरोधी नेत्याच्या मोहिमांमध्ये व्यत्यय आणणे किंवा तोडफोड करण्याभोवती त्यांचे धोरण फिरत होते. राजकीय नेत्याच्या घरी गृहकलह निर्माण व्हावा यासाठी त्यांनी ॲमेझॉनवरून त्याच्या घरी काही भेटवस्तू देखील पाठविल्या, जेणे करून त्यांची पत्नी त्याच्यावर प्रेमसंबंधांचा संशय घेईल. 
अबब... केवढी ही फी...
बिटकॉइन, रोख, क्रिप्टोकरन्सीसह विविध चलनांमध्ये हॉकिंग सेवेची फी स्वीकारली जाते. ती भारतीय रुपयांत ५३,०८,३३,३१८ रुपये ते (६ दशलक्ष युरो) १,३२,७१,२०,५०७ (१५ दशलक्ष युरो) रुपयांदरम्यान आहे. असे असले तरी त्याची फी यापेक्षाही जास्त असू शकते.

Web Title: A company changed the results of the elections of 33 countries!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.