टायटॅनिकपेक्षा पाचपट मोठी क्रुझ सज्ज! २७ जानेवारीला करणार प्रस्थान; 'ही' आहेत वैशिष्ट्ये...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 12:42 PM2024-01-07T12:42:14+5:302024-01-07T12:44:06+5:30
विशेष म्हणजे त्याच्या बहुतांश तिकिटांची विक्रीही झाली आहे
मियामी : जगभरात समुद्र पर्यटनासाठी क्रूझ प्रवासाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, जगातील सर्वांत मोठी क्रुझ तयार झाली आहे. टायटॅनिकपेक्षा सुमारे ५ पट मोठे हे जहाज येत्या २७ जानेवारीला व्यावसायिक प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे. विशेष म्हणजे त्याच्या बहुतांश तिकिटांची विक्रीही झाली आहे.
रॉयल कॅरेबियनद्वारा तयार करण्यात आलेली ‘ऑयकॉन ऑफ दि सीज’ ही क्रुझ सध्या व्यावसायिक प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पोर्टो रिको येथील बंदरात आली आहे. यानिमित्त येथील स्थानिक नागरिक व पर्यटक या क्रुझचा आनंद घेत आहेत.
ग्रीन एनर्जीचा वापर
लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) तसेच सेल टेक्नोलॉजीचा वापर क्रुझसाठी करण्यात येत असल्याने प्रदूषण कमी होणार आहे. शिवाय यामुळे कार्बन उत्सर्जनात ३० टक्के, तर सल्फर उत्सर्जनात १०० टक्के घट होणार आहे.
२० मजली शाही राजवाडा
फिनलँडच्या मायर तुर्कू गोदीत या क्रुझची बांधणी करण्यात आली. जवळपास २० मजले असलेल्या क्रुझमध्ये ५५ फूट उंचीचा धबधबा देखील आहे.
वैशिष्ट्ये-
- १,१९८ फूट लांब
- १ फूड हॉल
- २,५०,८०० टन वजन
- ७,६०० प्रवासी क्षमता
- ६ स्विमिंग पूल, सर्वांत मोठा वॉटर पार्क
- ३ फुटबॉल मैदानाएवढा आकार