कच्च्या तेलाच्या घसरणीचा थेट फायदा! पाकिस्तानने पेट्रोल 12, डिझेल 30 रुपयांनी कमी केले, तिजोरी रिकामी झाली तरी...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 01:43 PM2023-05-16T13:43:19+5:302023-05-16T13:43:47+5:30
कच्च्या तेलाची किंमत घसरली! पाकिस्तानने पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले, जनतेला थेट दिलासा
पाकिस्तानमध्ये राजकीय संकट आणि आर्थिक संकट उभे ठाकलेले असताना तसेच तिजोरी खाली असताना इंधनाच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. महागाईमध्ये होरपळून गेलेल्या पाकिस्तानी जनतेला मोठा दिलासा देण्यात आला आहे. पेट्रोलच्या दरात १२ रुपयांची तर डिझेलच्या दरात ३० रुपयांची कपात करण्यात आली आहे.
या किंमती पुढीसल १५ दिवसांसाठी वैध असणार आहेत. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक डार यांनी सोमवारी याची घोषणा केली. सोमवारी त्यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला. यामध्ये शाहबाज शरीफ सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलांच्या किंमती कमी झाल्या आहेत, त्याचा फायदा जनतेला देण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले. तसेच आज रात्रीपासून १२ वाजल्यानंतर पुढील १५ दिवसांसाठी पेट्रोल १२ रुपये आणि डिझेल ३० रुपयांनी कमी केले जात आहे, अशी घोषणा केली.
या नव्या दरांनुसार पेट्रोल २७० रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेलची किंमत 258 रुपये झाली आहे. रॉकेलमध्ये देखील १२ रुपयांची कपात करण्यात आली आहे. ती आता 164.07 रुपये असणार आहे. तर हलके डिझेलची किंमत १२ रुपयांनी कमी होऊन 152.68 रुपये प्रति लीटर झाली आहे.
इंधनाच्या विक्रीत मोठी घट
पाकिस्तानात इंधनाचे दर चढे आहेत. आधीच आर्थिक संकटामुळे तेथील लोकांची परिस्थिती बिघडलेली आहे. असे असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा इंधनाची विक्री ४७ टक्क्यांनी कमी होऊन 1.171 दशलक्ष टनांवर आली आहे. गेल्या वर्षीच्या विक्रीतही २४ टक्क्यांची घट झाली होती.
पाकिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे आणि ते मदतीसाठी हाका मारत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे 2019 मध्ये केलेल्या बेलआउट पॅकेज कराराचा पहिला $ 1.1 अब्ज हप्ता जारी करण्याची सतत मागणी करत आहे. मात्र अद्यापपर्यंत आयएमएफने त्याला मान्यता दिलेली नाही.