एका कुटुंबानं पूर्ण देशाला लावली नशेची लत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 07:44 AM2023-05-09T07:44:38+5:302023-05-09T07:46:16+5:30

सॅकलर या आडनावाच्या एका कुटुंबाने नव्वदच्या दशकात अख्ख्या अमेरिकेला नशेची लत लावली होती, ते तुम्हाला माहिती आहे का?

A family made the whole country addicted | एका कुटुंबानं पूर्ण देशाला लावली नशेची लत!

एका कुटुंबानं पूर्ण देशाला लावली नशेची लत!

googlenewsNext

कोणतीही नशा आरोग्याचे तीन तेरा वाजवतेच. पण नशा ही काही फक्त दारू, सिगारेट, अमली पदार्थ यांची थोडीच असते? कोणत्याही गोष्टीचा अतिरेक म्हणजे नशाच. काहींना खूप व्यायाम करायची सवय असते, काहींना अतिरेकी स्वच्छतेची सवय असते. काहींना प्रत्येक गोष्ट स्वत:च आणि अतिशय टापटिपीने करण्याची सवय असते, इतर दुसऱ्या कोणी ते काम केलेलं त्यांना खपत नाही. समजा एखाद्यानं केलंच ते काम, तर ते स्वत: पुन्हा ते काम आपल्या पद्धतीनं करतात.. हे सारे नशेचेच प्रकार. नशेचा आणखी एक आणि सर्वमान्य प्रकार म्हणजे औषधं! अनेकजण औषधांचं अतिरेकी सेवन करतात. काहीजण कुठल्याही साध्यासुध्या दुखल्या-खुपल्यालाही गोळ्यांचा मारा सुरू करतात. गोळ्यांच्या याच ओव्हरडोसची मग सवय होते आणि त्याचं नशेत रूपांतर होतं..

औषधांची ही नशा तर अमेरिकेत फारच ‘लोकप्रिय’ आहे. या नशेमुळे दरवर्षी अमेरिकेत जगातील सर्वाधिक लोक मृत्युमुखी पडतात. अमेरिकेत नशेचं आणि त्यातही औषधांच्या नशेचं प्रमाण जास्त आहे, हे तर खरंच, पण त्याहीपेक्षा मोठी आणि धक्कादायक बाब म्हणजे या देशातील केवळ एकाच कुटुंबानं अख्ख्या अमेरिकेला नशेची लत लावली असं मानलं जातं. त्या कुटुंबाचं नाव आहे सॅकलर फॅमिली. कोण आहे ही सॅकलर फॅमिली? त्यासाठी आपल्याला काही वर्षं मागे जावं लागेल. ९०च्या दशकातली ही गोष्ट आहे. त्यावेळी अमेरिकेच्या अनेक डॉक्टरांना वाटत होतं, की आपल्या देशातील लोकांमध्ये विविध प्रकारच्या दुखण्यांची गंभीर समस्या आहे. यावर तातडीनं उपाययोजना, औषधांची गरज आहे. त्यानंतर अमेरिकेच्या औषध कंपन्यांमध्ये दुखण्यांवरची औषधं (पेनकिलर्स) बनवण्यासाठी जणू स्पर्धाच सुरू झाली. 

यात सर्वांत अग्रभागी होती ती अमेरिकेतील परड्यू फार्मा ही कंपनी. या कंपनीमध्ये सॅकलर कुटुंबीय भागीदार तर होतंच, पण ही पेनकिलर्स बनविण्यात डॉ. रिचर्ड सॅकलर यांची प्रमुख भूमिका होती. या कंपनीनं जे पेनकिलर तयार केलं होतं, त्याचं नाव होतं ऑक्सिकोंटिन. खरं तर पेनकिलरच्या नावाखाली तयार केला गेलेला हा एक नशिला पदार्थ होता. काही तज्ज्ञांनी त्यावर आपलं मत व्यक्त केलं होतं, की या वेदनाशामक औषधामुळे खरंच लोक वेदनामुक्त होतील की नाही, हे माहीत नाही, पण त्यांना या औषधाचं व्यसन मात्र लागू शकतं! अर्थातच परड्यू कंपनीला या सल्ल्याशी काहीही देणंघेणं नव्हतं. त्यांना कमवायचा होता तो फक्त पैसा! त्यांनी मोठ्या प्रमाणावर या औषधाचं मार्केटिंग सुरू केलं. अमेरिकेतल्या डॉक्टरांना आमिष दाखवलं आणि पेशंटला हेच औषध प्रिस्क्राइब करण्यासाठी प्रवृत्त केलं. अमेरिकेतल्या डॉक्टरांनी किती लोकांना हे औषध लिहून द्यावं? केवळ २०१२ या एका वर्षातच अमेरिकेतल्या डॉक्टरांनी आपल्याकडे वेळोवेळी आलेल्या २५ कोटीपेक्षाही जास्त पेशंट्सना ऑक्सिकोंटिन हे औषध लिहून दिलं! यावरून कंपनीचं ‘मार्केटिंग’ लक्षात यावं. एवढंच नाही, देशाच्या औषध धोरणांबाबत जी एनजीओ अमेरिकेला सल्ला देते, त्या संस्थेलाही परड्यू या कंपनीनं प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी दिला. त्यामुळे या संस्थेनंही अमेरिकन सरकारला या औषधाची शिफारस केली, असं मानलं जात आहे. या साऱ्या प्रकरणात सॅकलर परिवाराचा खूप मोठा वाटा होता.

या औषधामुळे खूप लोक मरताहेत, हे लक्षात आल्यानंतर या औषधावर निर्बंध आणण्याचा निर्णय अमेरिकन सरकारनं घेतला. २०१५ मध्ये तर या औषधामुळे अमेरिकेत तब्बल ५२ हजार लोक मृत्युमुखी पडले होते. १९९५ मध्ये एड्स महामारीदरम्यान जेवढे मृत्यू झाले होते, त्यापेक्षाही हा आकडा मोठा होता. ‘या प्रकाराला ‘ओपिऑइड एपिडेमिक’ संबोधलं गेलं आणि त्याला सॅकलर परिवाराला जबाबदार धरण्यात आलं. कारण औषध निर्मिती आणि त्याच्या प्रचार, प्रसारात हे कुटुंब कित्येक वर्षं सक्रिय होतं. अगदी २०१८ पर्यंत या कुटुंबातील सदस्य बोर्ड ऑफ मेंबर्समध्ये होते. यासाठी परड्यू कंपनीला प्रचंड दंडही करण्यात आला. सहा अब्ज डॉलर्सवर त्याची ‘सेटलमेंट’ करण्यात आली. पेन किलर्सच्या नावाखाली कंपनीनं अक्षरश: खोऱ्यानं पैसा कमावला, मात्र सगळीकडून टीका सुरू झाल्यानंतर सॅकलर कुटुंबानं २०१९ मध्ये कंपनी दिवाळखोरीत गेल्याचं जाहीर केलं. या कंपनीविरुद्ध तब्बल २,३०० दावेही दाखल करण्यात आले होते.

‘औषधा’साठी मोजली प्राणांची किंमत! 

अमेरिकेच्या न्यायालयानं परड्यू कंपनीला त्यांच्या कारवायांबाबत दोषी ठरवलं. या ‘औषधाची’ लोकांना नशा लागू शकते, हे कंपनीनं लपवल्यामुळे अनेकजण या नशेच्या आहारी तर गेलेच, पण कित्येकांना त्यासाठी आपल्या प्राणांची किंमत मोजावी लागली!

Web Title: A family made the whole country addicted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.