जगातल्या मौल्यवान हिऱ्यांचा वेधक इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 05:14 AM2024-08-24T05:14:01+5:302024-08-24T05:14:41+5:30
हिऱ्यांचा इतिहास तपासला तर लक्षात येईल की, १९०५मध्ये जगातला सर्वांत मोठा हिरा ‘शोधला’ गेला होता.
तुम्ही कधी हिरा पाहिला आहे किंवा खरेदी केला आहे? तुम्ही जर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला असाल किंवा तुम्ही खरोखरच अतिशय कर्तृत्ववान असाल आणि स्वबळावर तुम्ही प्रचंड संपत्ती कमावली असेल तर कदाचित तुम्ही हिरा खरेदी करू शकाल? अर्थातच तुम्ही खरेदी केलेला हिरा किती कॅरेटचा आहे, यावरही त्याची किंमत अवलंबून असते.
हिऱ्यांचा इतिहास तपासला तर लक्षात येईल की, १९०५मध्ये जगातला सर्वांत मोठा हिरा ‘शोधला’ गेला होता. हा हिरा होता तब्बल ३१०६ कॅरेटचा. हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा आणि ‘वजनदार’ हिरा होता. एक कॅरेट म्हणजे साधारणपणे २०० मिलीग्रॅम. याचाच अर्थ ३१०६ कॅरेटचा हा हिरा तब्बल ६२१ ग्रॅमचा म्हणजे अर्ध्या किलोपेक्षाही बऱ्याच जास्त वजनाचा होता! या हिऱ्याला ‘कलिनन डायमंड’ म्हटलं जातं. खाण कंपनीचे तत्कालीन मालक थॉमस कुलिनन यांचंच नाव या हिऱ्याला देण्यात आलं होतं.
१९०७मध्ये ब्रिटिश राजा एडवर्ड याला हा हिरा भेट म्हणून देण्यात आला होता. त्यानंतर या हिऱ्याचे एकूण नऊ तुकडे करण्यात आले. त्यातला सर्वांत मोठा तुकडा राजाच्या राजदंडाला लावण्यात आला, तर दुसरा एक तुकडा त्याच्या राजमुकुटाला बसवण्यत आला. सगळ्यांत मोठ्या हिऱ्याला ‘ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका’ असंही म्हटलं जातं. कारण हा हिरा दक्षिण आफ्रिकेत सापडला होता.
आता ११९ वर्षांनी असाच आणखी एक हिरा मिळाला आहे, जो २४९२ कॅरेटचा, तब्बल अर्धा किलो वजनाचा आणि जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा हिरा आहे. दक्षिण आफ्रिकेतल्याच बोत्सवाना या देशात हा हिरा आढळून आला आहे. सध्याच्या काळात बोत्सवाना ही अक्षरश: आणि शब्दश: हिऱ्यांची खाण आहे. जगात सर्वाधिक हिरे याच देशात सापडतात. जगात जितके हिरे मिळतात, त्यातील तब्बल २३ टक्के हिरे एकट्या बोत्सवानामधील आहेत, असतात.
बोत्सवानाच्या अर्थव्यवस्थेतही हिऱ्यांचं स्थान खूप मोठं आहे. या हिऱ्यांवरच त्यांची अर्थव्यवस्था चालते असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नात या हिऱ्यांचा खूप मोठा वाटा आहे. जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा हिरा सापडल्यामुळे नागरिकांसह सरकारमध्येही खूप आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे हा हिरा नागरिकांना प्रत्यक्ष पाहता यावा आणि एका अलौकिक इतिहासाचा त्यांना साक्षीदार होता यावं, यासाठी तो लवकरच प्रदर्शनात ठेवण्यात येईल, असं सरकारनं जाहीर केलं आहे. बोत्सवानाची राजधानी गॅबरोनपासून पाचशे किलोमीटर दूर असलेल्या एका खाणीतून हा हिरा शोधण्यात आला.
याआधी याच खाणीत २०१९मध्ये १७५८ कॅरेटचा हिरा सापडला होता. फ्रान्सची फॅशन कंपनी लुई विटॉननं हा हिरा खरेदी केला होता. हा हिरा त्यांनी किती किमतीत खरेदी केला किंवा त्यांना विकण्यात आला हे जाहीर करण्यात आलं नाही. मात्र, त्याआधी २०१७ मध्ये बोत्सवानाच्याच दुसऱ्या एका खाणीत सापडलेला १,१११ कॅरेटचा हिरा ४४४ कोटी रुपयांमध्ये विकला गेला होता. ब्रिटनच्या एका जवाहिऱ्यानं तो खरेदी केला होता. ज्यांना हा हिरा सापडला त्या लुकारा डायमंड फर्मचे प्रमुख विल्यम लँब यांचं म्हणणं आहे, या हिऱ्याच्या शोधानं आम्ही अतिशय खूश झालो आहोत. आमच्या ‘मेगा डायमंड रिकव्हरी एक्स-रे’ तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं आम्ही हा हिरा शोधून काढला. या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम आता वेगानं सुरू आहे.
बोत्सवानाने गेल्या महिन्यात खाणकामासंदर्भात नवीन कायदा प्रस्तावित केला. त्याअंतर्गत, परवाना मिळाल्यानंतर खाण कंपन्यांना स्थानिक गुंतवणूकदारांना २४ टक्के हिस्सा द्यावा लागेल. जाणकारांच्या मते या हिऱ्याची किंमत किमान एक हजार कोटी रुपये, तर काही तज्ज्ञांच्या मते या हिऱ्याची किंमत त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. या हिऱ्याच्या किमतीबरोबरच त्याच्या ‘भविष्या’विषयी, हा हिरा अखंड विकला जाईल की, याचेही छोटे तुकडे करून ते विकले जातील याविषयी लोकांमध्ये प्रचंड कुतूहल आहे. या हिऱ्यामुळे हिऱ्यांच्या जागतिक बाजारपेठेतील बोत्सवानाचं महत्त्व आणखी वाढलं आहे. हिरे उत्पादनात कित्येक वर्षांपासून आपला पहिला नंबर त्यांनी टिकवून ठेवला आहे.
..तर हिऱ्याची राखही राहत नाही!
जगात हिरे उत्खननात बोत्सवानानंतर कॅनडा, कांगो डीआर, दक्षिण आफ्रिका, अंगोला, झिम्बाम्ब्वे, नामिबिया, लिसोटो, सिएरा लिओन इत्यादी देशांचा नंबर लागतो. नैसर्गिक हिरा ९९.९५ टक्के कार्बनपासून तयार झालेला असतो. त्यात केवळ ०.०५ टक्के इतर पदार्थ असतात. या पदार्थांचं प्रमाण अत्यंत कमी असलं तरी हिऱ्याची चमक त्यांच्यावरच अवलंबून असते. ७६३ अंश सेल्सिअसला तापवल्यानंतर हिऱ्याची राखही शिल्लक राहात नाही. कार्बन डायऑक्साइडमध्ये त्याचं रूपांतर होतं.