वडील, नवरा, रॉस फोर्ड... आणि एक पुस्तक; ४० वर्षापूर्वीची जुनी आठवणी पुन्हा ताजी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 11:10 AM2023-09-22T11:10:02+5:302023-09-22T11:10:18+5:30
हे पुस्तक मुळात १९३२ साली प्रकाशित झालं होतं. बऱ्यापैकी लोकप्रिय असणाऱ्या त्या पुस्तकाच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत
पुस्तकांवर प्रेम करणारी माणसं जगभर सगळीकडे असतात. ही माणसं आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगी पुस्तकं भेट देतात. एखाद्या प्रसंगी, एखाद्या व्यक्तीला कुठलं पुस्तक भेट द्यावं, याची त्यांना समज असते. त्यांना तेवढी माहिती असते. त्यांनी अनेकदा स्वतः खूप पुस्तकं वाचलेली असतात किंवा निदान पुस्तकांबद्दल खूप वाचलेलं असतं. त्यांना आवडलेलं, किंवा महत्त्वाचं वाटलेलं पुस्तक ते कुठूनही मिळवून आणतातच. मग ते प्रत्यक्ष दुकानात जाऊन आणायचं असू दे किंवा ऑनलाइन ऑर्डर करायचं असू दे!
इंग्लंडमधील ईस्ट ससेक्स परगण्यात राहणाऱ्या रॉस फोर्ड नावाच्या बाईंनी नुकतंच त्यांच्या नवऱ्यासाठी अल्ड्स हक्सले नावाच्या लेखकाचं टेक्सट्स अँड प्रीटेक्सट्स नावाचं पुस्तक ऑर्डर केलं. ते पुस्तक घरी आलं, त्यांनी ते उघडून बघितलं आणि त्यांना आनंदाश्चर्याचा धक्काच बसला. कारण ते पुस्तक त्यांनीच त्यांच्या वडिलांना चाळीस वर्षांपूर्वी भेट दिलं होतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीने दोनवेळा तेच पुस्तक विकत घ्यायचं ठरवलं, तर तिला त्याच आवृत्तीची प्रत मिळेल, याचीही शाश्वती नसते; पण या रॉस फोर्ड बाईंना मात्र त्यांनी वडिलांना भेट दिलेलीच प्रत पुन्हा विकत मिळाली.
झालं होतं असं, की फोर्ड बाईंनी १९८४ साली हे पुस्तक त्यांच्या वडिलांसाठी विकत घेतलं होतं. त्या सांगतात, “माझे वडील त्यावेळी सेवानिवृत्त होत होते. त्यावेळी मला असं वाटलं की, त्यांना आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा आणि छान दृष्टिकोन देणारं काहीतरी द्यावं. त्यावेळी मला या पुस्तकाचं नाव सुचलं. आणि मी ते त्यांना भेट दिलं.” हे पुस्तक मुळात १९३२ साली प्रकाशित झालं होतं. बऱ्यापैकी लोकप्रिय असणाऱ्या त्या पुस्तकाच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. बरं, इंग्लिश पुस्तकांच्या आवृत्याही मोठ्या असतात. कित्येकवेळा एक आवृत्ती दहा हजार किंवा पन्नास हजार पुस्तकांची देखील असू शकते.
असं पुस्तक वडिलांना भेट दिल्यानंतर रॉस फोर्ड त्या पुस्तकाबद्दल विसरूनही गेल्या होत्या; मात्र आता त्यांच्या नवऱ्याचा ८३वा वाढदिवस जवळ आला होता. त्यात त्यांनी एका वृत्तपत्रात काहीतरी असं वाचलं ज्यामुळे त्यांना पुन्हा एकदा त्याच पुस्तकाची आठवण झाली. यावेळी रॉस फोर्डना वाटलं, की हे पुस्तक एखाद्या सेकंडहँड पुस्तकांच्या ऑनलाइन दुकानातून विकत घ्यावं.
त्यानुसार त्यांनी ABE बुक्स या ऑनलाइन पुस्तकांच्या वेअरहाऊसमध्ये या पुस्तकासाठीची मागणी नोंदविली. त्या वेअरहाऊसच्या अंतर्गत यंत्रणेनुसार त्यांची ती ऑर्डर कॅम्ब्रियामधील व्हाइट हॅवन इथे असणाऱ्या मायकेल मून यांच्या दुकानात नोंदविली गेली. हे दुकान रॉस फोर्ड यांच्या घरापासून शेकडो किलोमीटर्स दूर होतं. त्यांनी पुस्तकाची ऑर्डर मिळाल्यावर त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सेकंडहँड प्रतींपैकी एक प्रत रॉस फोर्ड यांना पाठवून दिली.
ती प्रत घरी आल्यावर उघडून बघितल्यावर रॉस बाईंना दिसलं, की त्या प्रतीच्या पहिल्या पानावर कोणाच्या तरी हस्ताक्षरात काहीतरी लिहिलेलं आहे. ते काय लिहिलेलं आहे, हे बघायला गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की तो संदेश कोणीतरी कोणाला तरी उद्देशून लिहिला आहे. साहजिकच तो संदेश त्यांनी वाचला आणि त्यांच्या लक्षात आलं की, चाळीस वर्षांपूर्वी त्यांनीच तो संदेश त्यांच्या वडिलांसाठी लिहिला होता.
“मी जेव्हा वडिलांना ते पुस्तक भेट दिलं त्यावेळी मला असं वाटलं की, त्यावर आपण काहीतरी लिहून द्यावं. म्हणून मी तो संदेश लिहिला होता आणि त्या संदेशामुळेच मला हे ओळखू आलं की, हे तेच पुस्तक आहे, जे मी माझ्या वडिलांना भेट दिलं होतं.” टेक्सट्स अँड प्रीटेक्सट्स या पुस्तकाच्या जगात अक्षरशः हजारो प्रती असतील. त्यातून नेमकी तीच प्रत दोनवेळा आपल्या हाती लागावी, याचं रॉस बाईंना आश्चर्य वाटलं यात काही नवल नाही. योगायोग घडण्याची ही परिसीमा आहे. हे पुस्तक आपल्या वडिलांनी हाताळलं होतं, ही भावनाच त्यांच्यासाठी किती सुखावणारी असेल, याची कोणीही कल्पना करू शकतं. रॉस बाई म्हणतात, “या घटनेने माझ्या आयुष्यातील एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं मला वाटतं आहे. आणि माझ्या भाग्यात एकच पुस्तक दोनवेळा विकत घेणं लिहिलेलं आहे.”
सेकंडहँड सुखाचा योगायोग
एखादी वस्तू आपण नवीन घेऊ शकत असतानाही ती सेकंडहँड दुकानातून घेण्यातील हा एक अदृश्य फायदाच म्हणायचा. प्रत्येक वापरलेल्या वस्तूशी कोणाची ना कोणाची काही तरी आठवण जोडलेली असते. काही जणांना योगायोगाने स्वतःचीच आठवण जोडली गेलेली एखादी वस्तू या प्रकारच्या दुकानात मिळू शकते. जशी रॉस फोर्ड बाईंना मिळाली.