उच्च अधिकाऱ्याचा ४०० महिलांवर अत्याचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 11:45 AM2024-11-09T11:45:34+5:302024-11-09T11:56:31+5:30

अधिकाराच्या पदावर असलं की कोण काय करेल याचा काहीही भरोसा नसतो. जगभरातला असा कोणताही देश नसेल, जिथे लोक आपल्या ...

A high official abused 400 women! | उच्च अधिकाऱ्याचा ४०० महिलांवर अत्याचार!

उच्च अधिकाऱ्याचा ४०० महिलांवर अत्याचार!

अधिकाराच्या पदावर असलं की कोण काय करेल याचा काहीही भरोसा नसतो. जगभरातला असा कोणताही देश नसेल, जिथे लोक आपल्या अधिकाराचा दुरुपयोग स्वत:च्या स्वार्थासाठी करीत नसतील. अधिकाराचा उपयोग करून कोणी आपलं स्वत:चं उखळ पांढरं करून घेतो, कोणी वारेमाप संपत्ती कमवतो, कोणी चार पिढ्यांचं कोटकल्याण करतं, कोणी महिलांचा, आपल्या स्त्री सहकाऱ्यांचा लैंगिक छळ करतं..असंच एक अतिशय मोठं सेक्स स्कँडल इक्वेटोरियल गिनी या देशात घडलं आहे. यामुळे या मध्य आफ्रिकन देशात अक्षरश: भूकंप झाला आहे. सरकारसहित लोकही आश्चर्यचकित झाले आहेत, पण केवळ या देशाचे नागरिकच नाहीत, तर अख्ख्या जगानं यामुळे अचंबा व्यक्त केला आहे आणि अशा लोकांना फासावर लटकवलं पाहिजे अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर तर चर्चेचा अक्षरश: पूर लोटला आहे. 

असं घडलं तरी काय या देशात? - इक्वेटोरियल गिनी या देशातील एका बड्या अधिकाऱ्याचं नाव आहे बाल्टासर एबांग एंगोंगा. तेथील नॅशनल फायनान्शिअल इन्वेस्टिगेशन एजन्सी (ANIF)चे ते महासंचालक (डायरेक्टर जनरल) आहेत. एका फसवणुकीच्या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती. त्याच दरम्यान त्यांच्या व्यक्तिगत संगणकाचीही तपासणी करण्यात आली. ती तपासणी केल्यानंतर त्यांच्या संगणकात जे काही सापडलं, त्यामुळे तपासणी अधिकाऱ्यांचीही अक्षरश: पायाखालची वाळू सरकली. इतक्या मोठ्या प्रमाणात अशा गोष्टी होऊ शकतात, यावर त्यांचाही विश्वास बसेना. एंगोंगा यांच्या संगणकात जवळपास चारशेपेक्षा अधिक व्हिडीओ सापडले. हे सारेच व्हिडीओ अश्लील होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांशी अनैतिक संबंध करतानाचे हे सारे व्हिडीओ होते. त्यातही सर्वांनाच हादरवणारी गोष्ट म्हणजे त्यात त्यांच्या जवळच्या महिला नातेवाईक जशा होत्या, तशाच चक्क देशाच्या राष्ट्रपतींच्या नातेवाइक महिलांचाही समावेश आहे. अक्षरश: शेकडो महिलांशी अनैतिक संबंधांचे हे व्हिडीओ त्यांच्या संगणकात आढळल्याचं जाहीर झाल्यानंतर इक्वेटोरियल गिनी या देशातील लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहेे. अशा प्रकारच्या चारित्र्यहीन आणि आपल्या पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्याला मुळात पदावर ठेवलंच कसं आणि इतकी वर्षं इतक्या बिनदिक्कतपणे तो महिलांवर अत्याचार कसा काय करत होता, याबद्दल आपल्या सरकारलाच धारेवर धरलं आहे. हे सरकारचंही अपयश आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. या अधिकाऱ्याला आमच्या ताब्यात द्या, त्याला आम्ही आमच्या पद्धतीनं धडा शिकवू, अशी संतप्त मागणी अनेक महिला, पुरुष तसंच संघटनांनी केली आहे. 

या व्हिडीओंमध्ये चक्क आपल्या कार्यालयात तसंच पब्लिक रेस्टरुम्स, हॉटेल्स.. अशा विविध ठिकाणी महिलांवर अत्याचार करीत असल्याचे हे फोटो आहेत. हा आरोपी विवाहित असून, त्याला सहा मुलंही आहेत.  या आरोपीनं इतक्या महिलांवर अत्याचार केलेत, त्यातील किती संबंध सहमतीनं होते आणि किती संबंध त्यानं या महिलांना धमकावून, आपल्या पदाचा गैरवापर करून केलेत, याचा तपास आता सुरू आहे. ॲटर्नी जनरल यांच्या कार्यालयानंही आता यात लक्ष घातलं असून, आरोपीला सोडलं जाणार नाही, त्याची कसून चौकशी होईल आणि त्याच्यावर कठोर कारवाई होईल असं आश्वासन देण्यात आलं आहे. अनेकांचं म्हणणं आहे, हे तर फक्त हिमनगावरचं टोक आहे. आणखीही इतर महिलांवर त्यानं अत्याचार केला असण्याची शक्यता आहे. बदनामीच्या भीतीनं अजून तरी त्याच्याविरुद्ध कोणी पुढे आलं नसलं तरी अनेक महिला तक्रारीसाठी आता पुढे येतील असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. ज्यांच्यावर अन्याय, अत्याचार झाला त्या महिलांनी धीटपणे पुढे येऊन तक्रार करावी असं आवाहन केलं जात आहे. त्यांची माहिती गुप्त ठेवण्यात येईल असंही आश्वासन त्यांना देण्यात आलं आहे. काही महिला अधिकाऱ्यांचीही यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. एंगोंगाच्या कार्यालयातील आणि त्याच्याशी कार्यालयीन संबंध आलेल्या महिलांनाही यासंदर्भात विश्वासात घेऊन त्यांच्याकडून आता माहिती घेतली जात आहे.

जवळच्या नातेवाइकांवरही अत्याचार
एंगोंगाच्या संगणकात सापडलेल्या व्हिडीओमध्ये त्याची वहिनी, चुलत बहीण, खुद्द राष्ट्रपतींची एक जवळची महिला नातेवाइक, त्यांच्या सहकारी महिला यांच्यावर एंगोंगानं अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. यासंदर्भात उपराष्ट्रपती टेओडोरो न्गुएमा यांनी सर्व सरकारी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे की, जो अधिकारी, कर्मचारी आपल्या कामाव्यतिरिक्त इतर बेकायदेशीर गोष्ट करताना आढळेल, त्याची कोणतीही गय केली जाणार नाही.

Web Title: A high official abused 400 women!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.