हिंदू कवीनं लिहिलं होतं पाकिस्तानचं पहिलं राष्ट्रगीत, पण फाळणीनंतर त्यांची झाली अशी अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 01:37 PM2024-08-19T13:37:56+5:302024-08-19T13:38:52+5:30
Jagannath Azad: धर्माच्या आधारावर ज्या पाकिस्तानची निर्मिती झाली त्याचं पहिलं राष्ट्रगीत (First National Anthem of Pakistan) एका हिंदू व्यक्तीनं लिहिलं होतं, ही बाब कदाचित आजच्या पिढीला माहित नसेल.
१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळताना देशाची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रं निर्माण झाली होती. मात्र धर्माच्या आधारावर ज्या पाकिस्तानची निर्मिती झाली त्याचं पहिलं राष्ट्रगीत एका हिंदू व्यक्तीनं लिहिलं होतं, ही बाब कदाचित आजच्या पिढीला माहित नसेल. पाकिस्तानचं पहिलं राष्ट्रगीत लिहिणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं जगन्नाथ आझाद. प्रख्यात कवी आणि शायर असलेले आझाद हे हेव्हा लाहोर येथे वास्तव्यास राहात होते. तेव्हा फाळणीची चर्चा चहुबाजूंना पसरली होती. तेव्हा मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र निर्मितीचं जिना यांचं स्वप्न पूर्ण होणार होतं. त्यावेळी देशासाठी एक स्वतंत्र राष्ट्रगीत असावं, असा विचार जिना यांच्या मनात होता.
मुस्लिम समाजाचं नेतृत्व करणाऱ्या जिना यांनी आपली आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रतिमा चमकवण्यासाठी वेगळी रणनीती अमलात आणली होती. त्यांनी स्वत:ला धर्मनिरपेक्ष दर्शवण्यासाठी पाकिस्तानच्या राष्ट्रगीताची रचना करू शकेल, अशा एका हिंदू शायराचा शोध सुरू केला. मात्र जिना यांच्या या निर्णयामुळे मुस्लिम समाजामध्ये संतापाची भावना निर्माण झाली. काही वरिष्ठ मुस्लिमांनी नाराजी व्यक्त केली. एक हिंदू आमचं राष्ट्रगीत कसं काय लिहू शकतो, असा प्रश्न विचारला गेला. मात्र जिना यांनी २४ तासांमध्ये हिंदू शायराचा शोध घेण्याचे आदेश दिले.
त्यानंतर हिंदू कवी जगन्नाथ आझाद यांचं नाव समोर आलं. त्यांचं उर्दू भाषेवर प्रभुत्व होतं. देशाची फाळणी झाली तरीही लाहोर येथेच राहण्याचा निर्धार त्यांनी केलेला होता. दुसरीकडे पाकिस्तान हा सेक्युलर देश असावा, असा जिना यांचा विचार होता. जिना आझाद यांना भेटले आणि त्यांनी पाच दिवसांच्या आत पाकिस्तानसाठी राष्ट्रगीत लिहिण्यास सांगितले. पाकिस्तान रेडिओने या गीताला संगीत दिले. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी ते प्रसारित झाले. हे गीत जिना यांना खूप आवडले. या गीताला सुमारे दीड वर्षे राष्ट्रगीताचा मान मिळाला. नंतर जिना यांच्या मृत्यूनंतर कट्टरतावादी मुस्लिम नेत्यांच्या दबावामुळे हे राष्ट्रगीत बदललं गेलं.
दरम्यान, मी पाकिस्तानचं राष्ट्रगीत लिहिल्याने पाकिस्तानमध्ये राहणं माझ्यासाठी सुरक्षित असेल, असं जगन्नाथ आझाद यांना वाटत होतं. मात्र त्यांचं वास्तव्य असलेल्या रामनगरमध्ये कुणीच वाचलं नाही. शेवटी मित्रांच्या सांगण्यावरून जगन्नाथ आझाद यांना लाहोर सोडावं लागलं. पुढे दिल्लीत येऊन ते निर्वासितांच्या छावणीमध्ये काही काळ राहिले. तसेच माहिती प्रसारण मंत्रालयाच्या उर्दू नियतकालिकांमध्ये त्यांनी काम केलं.