पृथ्वीजवळून जात आहे पर्वताएवढा विशाल लघुग्रह, खगोलप्रेमींसाठी रोमांचकारी अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 06:59 IST2025-01-12T06:58:41+5:302025-01-12T06:59:12+5:30
जगभरातील खगोलप्रेमींना साध्या डोळ्यांनी तो दिसणार नाही, मात्र दुर्बिणीद्वारे नक्कीच पाहता येणार आहे.

पृथ्वीजवळून जात आहे पर्वताएवढा विशाल लघुग्रह, खगोलप्रेमींसाठी रोमांचकारी अनुभव
वॉशिंग्टन : पृथ्वीपेक्षा कितीतरी पट विशाल आकाराच्या ग्रहांचे आकाशगंगेत परिभ्रमण सतत सुरू असते. असंख्य उल्कापिंड,
लघुगृहांचे अंतराळातील कक्षांमध्ये परिभ्रमण करीत असतात. सध्या आपण सारेजण अत्यंत दुर्मीळ अशा खगोलीय घटनेचे साक्षीदार
बनणार आहोत. त्यामागे कारणही तसेच आहे. जवळपास एखाद्या पर्वताएवढ्या आकाराचा लघुग्रह सध्या पृथ्वीजवळून जात आहे.
या आठवड्याच्या शेवटी या लघुगृहांची दृश्यमानता सर्वाधिक असणार आहे. जगभरातील खगोलप्रेमींना साध्या डोळ्यांनी तो दिसणार नाही, मात्र दुर्बिणीद्वारे नक्कीच पाहता येणार आहे.
अभ्यासकांसाठी मोठी पर्वणी
अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने पृथ्वीजवळून जाणाऱ्या एका प्रचंड एस्टेरॉईडसंदर्भात सगळ्यांना अलर्ट जारी केला आहे.
हा अॅस्ट्रोइड पर्वताच्या आकाराचा आहे. यानंतर तो अनेक दशकांनी पुन्हा पृथ्वीजवळून जाणार आहे. त्याचे निरीक्षण हा खगोलप्रेमी आणि अभ्यासकांसाठी रोमांचकारी अनुभव असणार आहे.
पृथ्वीला धडकल्यास काय होईल ?
वैज्ञानिकांच्या मते, एवढ्या मोठ्या अॅस्ट्रोइडची पृथ्वीला धडक झाल्यास विनाशकारी परिणाम होऊ शकतात. नासाच्या माहितीनुसार, रविवारी १२ जानेवारीला एलिंडाची चमक सर्वाधिक असेल. दुर्बिणीच्या मदतीने लोकांना सहजपणे हा लघग्रुह पाहता येईल.
आकाराने किती मोठा आहे अॅस्ट्रोइड?
अमेरिकेची खगोल संशोधन संस्था नासाने दिलेल्या माहितीनुसार ८८७ एलिंडा असे या विशाल अॅस्ट्रोइडचे नाव आहे. हा लघुग्रह आकाराने अमेरिकेतील मॅनहॅटन शहराइतकाच रुंद असल्याचे स्पष्ट केले.
नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने दिलेल्या माहितीनुसार, हा अॅस्ट्रोइड ४.२ किलोमीटर इतका रुंद आहे. बुधवारी ८ जानेवारीला हा लघुग्रह पृथ्वीजवळ १.२३ कोटी किलोमीटर इतक्या अंतरावर आला होता.
हे अंतर पृथ्वी आणि चंद्रामधील अंतराच्या तब्बल ३२ पट इतके आहे. वैज्ञानिकांच्या मते, एलिंडा पुन्हा २०८७ पर्यंत पृथ्वीजवळ येणार नाही.