भर रस्त्यात चुंबन; इराणमध्ये 'किस ऑफ लव्ह'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 11:39 AM2023-01-05T11:39:54+5:302023-01-05T11:40:04+5:30

इराणच्या फुटबॉल खेळाडूंनी महिलांच्या समर्थनार्थ आणि सरकारी हडेलहप्पीच्या निषेधार्थ थेट आपल्याच देशाचं राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला होता.

A kiss in the street; 'Kiss of Love' in Iran | भर रस्त्यात चुंबन; इराणमध्ये 'किस ऑफ लव्ह'

भर रस्त्यात चुंबन; इराणमध्ये 'किस ऑफ लव्ह'

Next

इराणमध्ये सध्या महिला हक्कांच्या आंदोलनानं रान पेटलं आहे. मुस्कटदाबी करणाऱ्या सरकारविरुद्ध आणि तिथल्या लिंगभेदी कायद्यांबाबत सर्वसामान्य नागरिकही गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर उतरले आहेत. हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार सर्वतोपरी करतं आहे. निष्पाप लोकांना पकडणं, त्यांना तुरुंगात टाकणं, त्यांना देशद्रोही ठरवून सरळ मृत्युदंड देणं... यासारख्या अनेक घटनांनी इराण सध्या जगाचा केंद्रबिंदू ठरलं आहे. सरकारी अत्याचारांचं पाप एवढं मोठं की, आंदोलन केलं म्हणून कित्येक लहान मुलांनाही त्यांनी गोळ्या घातल्या आहेत, अनेकांना फासावर लटकवलं आहे. सरकारी अत्याचाराच्या निषेधाचा एक नमुना नुकत्याच झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतही दिसला होता. इराणच्या फुटबॉल खेळाडूंनी महिलांच्या समर्थनार्थ आणि सरकारी हडेलहप्पीच्या निषेधार्थ थेट आपल्याच देशाचं राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला होता.

या साऱ्या गोष्टीची सुरुवात झाली ती २२ सप्टेंबर २०२२ रोजी. महसा अमिनी ही इराणमधील २३ वर्षांची एक तरुणी. बेधडक, निडर आणि महिला हक्कांचं समर्थन करणारी. इराणमध्ये गेल्या कित्येक दशकांपासून महिलांसाठी एक स्वयंघोषित 'ड्रेस कोड' आहे. महिलांनी सार्वजनिक आणि अगदी खासगी ठिकाणीही कसं राहावं, कसं वागावं, कोणते कपडे घालावेत याचे अघोषित आणि अलिखित नियम आहेत. महसा अमिनीनं हे सारे नियम धाब्यावर बसवताना महिलांचा ड्रेस कोड धुडकावून लावला होता आणि आपले केसही कापले होते. पोलिसांचा, सरकारचा तिच्यावर राग होता. २२ सप्टेंबर रोजी पोलिसांनी तिला अटक केली, तुरुंगात टाकलं आणि तिच्यावर अनन्वित अत्याचार केले. त्यातच तिचा मृत्यू झाला. त्याच दिवसापासून इराणमध्ये आंदोलनाचा भडका उडाला. 

या आंदोलनाचं महत्त्व हेच की, ज्या महिला कधी घराबाहेर पडल्या नाहीत, आपल्यावरचे सगळे अत्याचार आजवर ज्या मूकपणे सहन करीत होत्या, त्याच महिला या आंदोलनाचं नेतृत्व करीत आहेत, आणि सर्वसामान्य महिलाही सरकारच्या नाकावर टिच्चून सरकारला खुलं आव्हान देत आहेत. चिडलेल्या सरकारनंही लोकांचं आंदोलन चिरडायला सुरुवात केली आहे. त्यात आतापर्यंत पाचशेपेक्षा जास्त नागरिक ठार झाले आहेत. त्यात जवळपास ७० मुलांचा समावेश आहे. सरकारच्या निषेधार्थ या महिलांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे प्रकारही अतिशय अभिनव आहेत. 

१. इराणमधील कायद्यानुसार महिलांसाठी सक्तीचा ड्रेस कोड आहे. आपलं शरीर थोडंही उघडं राहील असा पोशाख त्या सार्वजनिक ठिकाणी घालू शकत नाहीत, तिथे नृत्य करू शकत नाहीत आलिंगन किंवा चुंबन घेऊ शकत नाहीत. हे सगळे नियम महिलांनी धाब्यावर बसवताना नेमक्या त्याविरोधात कृती सुरू केल्या आहेत. त्या पाश्चात्त्य कपडे घालताहेत. त्यांनी हिजाब धुडकावून दिला आहे. आपले केस कापले आहेत, इतकंच काय, काही दिवसांपूर्वीच एका धाडसी तरुणीनं तर भर रस्त्यात आजूबाजूला कार्सचा गराडा असताना रस्त्याच्या मध्यभागी उभं राहून आपल्या बॉयफ्रेंडचं चुंबनही घेतलं. हा फोटो सध्या जगभरात सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
२. इराणमध्ये हिजाब म्हणजे महिलांच्या अस्तित्वाचं प्रतीक. पण हिजाबची ही सक्ती धुडकावून लावताना त्यांनी चक्क त्यांची होळी करायला सुरुवात केली आहे. यात शाळकरी, तरुण मुलींबरोबरच अनेक अभिनेत्री, सेलिब्रिटी महिलाही सामील झाल्या आहेत. आपले लांब केस कापून त्याचीही त्या होळी करताहेत.
३. अनेक महिला खेळाडूंनीही आपापला खेळ खेळताना हिजाब आणि ड्रेस कोड गुंडाळून ठेवला आहे.
४. कलेच्या माध्यमातूनही महिला स्वातंत्र्याच्या अभिव्यक्तीचा प्रचार आणि प्रसार करायला महिलांनी सुरुवात केली आहे.
५. ज्या आंदोलकांना पोलिसांनी ठार केलं, त्यांच्या अंत्यसंस्काराला मोठ्या प्रमाणात हजेरी लावताना लोकांनी त्या स्थळालाच आंदोलनाचं प्रमुख केंद्र बनवून टाकलं आहे.

दडपशाहीच्या विरोधात भडका!
इराणमध्ये सरकार महिलांचं हे आंदोलन दडपण्याचा जितका प्रयत्न करीत आहे, तितका त्याचा जास्त भडका उडतो आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी आता पॅलेट गन्सचा वापर सुरु केला आहे. त्यात अनेकांचे डोळे गेले आहेत. एकीकडे पोलिस महिलांनाही गोळ्या घालताहेत, तर महिलाही आपल्या स्वातंत्र्याच प्रतीक म्हणून भर रस्त्यात आपल्या जोडीदाराचं चुंबन घेत किस ऑफ लव्हचा एल्गार करण्याच्या घटना वाढताहेत.

Web Title: A kiss in the street; 'Kiss of Love' in Iran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Iranइराण