राजा मेला, ६ राण्या, २८ मुलांमध्ये ‘युद्ध’ सुरू!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 05:22 AM2022-01-22T05:22:05+5:302022-01-22T05:22:20+5:30
अनेक देशांतली राजेशाही आज संपुष्टात आलेली असली, तरी त्यांचं ‘राजेपण’ मात्र संपलेलं नाही. या राजांना आता लोकशाहीत फारसे अधिकार ...
अनेक देशांतली राजेशाही आज संपुष्टात आलेली असली, तरी त्यांचं ‘राजेपण’ मात्र संपलेलं नाही. या राजांना आता लोकशाहीत फारसे अधिकार नसले, तरी त्यांच्याविषयी लोकांना अजूनही आदर आहे आणि ‘राजा’ म्हणूनच त्यांच्याकडे आणि त्यांच्या परिवाराकडे पाहिलं जातं. या राजांना लोकशाहीत विशेष कार्यकारी अधिकार नसले, तरी त्यांच्याकडे आजही मोठी संपत्ती आहे. मानमरातब तर आहेच आहे. लोकं त्यांच्याकडे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे राजघराणं म्हणूनच पाहतात.
दक्षिण आफ्रिकेतील प्राचीन झुलू जनजाती समूहात अजूनही राजा आणि राजेशाहीची परंपरा कायम आहे. येथील राजा गुडविल झ्वेलिथिनी यानं ५० वर्षे राजेपदाचा मुकुट मिरविल्यानंतर गेल्या वर्षी त्याचं निधन झालं. त्यावेळी त्याचं वय ७२ वर्षे होतं. या राजाला तब्बल सहा राण्या आणि ‘किमान’ २८ मुलं आहेत. राजा तर गेला, पण त्याचा ‘उत्तराधिकारी’, ‘वारसदार’ कोण, यावरून आता त्याच्या कुटुंबातच ‘गृहयुद्ध’ सुरू झालं आहे. मीच राजाचा उत्तराधिकारी म्हणून राजाच्या सहाही राण्या आणि २८ मुलं आता एकमेकांवर ‘वार’ करू लागले आहेत. याबद्दल कायदेशीर लढाईही त्यांनी सुरू केली आहे.
या राजाच्या मालकीची हजारो हेक्टर जमीन, इतर प्रॉपर्टी आणि ठिकठिकाणी अनेक राजमहालही आहेत. यावर आपलाच कब्जा असावा, असं आता साऱ्यांनाच वाटू लागलं आहे. या शाब्दिक भांडणांतून आणि हमरीतुमरीवर येऊन काहीही उपयोग न झाल्यानं शेवटी हे प्रकरण कोर्टात गेलं, पण याप्रकरणी काय निर्णय घ्यावा, याबाबत कोर्टही विचारात पडलं आहे. त्यामुळे वर्ष झालं, न्यायालयही अद्याप काहीही निर्णय घेऊ शकलं नाही. त्यामुळे रिकाम्या हासनावर अजून राज्याभिषेक होऊ शकलेला नाही.
इथल्या राजाचं अधिकृत राजेपद कधीचंच गेलं असलं तरी झुलू जमातीतील त्याच्या ‘प्रजेवर’ आजही त्याचा मोठा नैतिक प्रभाव आहे. बऱ्याचशा झुलू प्रजातीला तर राजाचं प्रकरण न्यायालयात जाणंच मान्य नाही. त्यांचं म्हणणं आहे, न्यायालय काय राजापेक्षा मोठं आहे का? आम्ही न्यायालयाला नाही, राजघराण्यालाच मानतो. शाही परंपरेनुसारच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, घेतला गेला पाहिजे. त्यासाठी अंगावर प्राण्यांच्या कातड्यांची वल्कलं परिधान केलेल्या, हातात ढाली असलेल्या अनेक झुलू नागरिकांनी न्यायालयासमोर निदर्शनं केली आणि पारंपरिक गाणी गात निषेधही व्यक्त केला.
राजाच्या एका विधवा राणीनं तर दावा केला आहे, की आमचं लग्न कायदेशीररीत्याही वैध होतं, इतर पाच राण्यांचा विवाह मात्र कायदेशीर नाही. पारंपरिक रीतिरिवाजानुसार हे विवाह झालेले आहेत. त्यामुळे या विवाहांना काहीच मान्यता, अधिकार नाही आणि माझ्याशिवाय कुठल्याही उत्तराधिकाऱ्याचा प्रश्नच नाही. या राज्याची मीच एकमेव वारसदार आहे.
राजा गुडविलची पहिली राणी सिबोंगिल दलामिनी हिनं क्वाजुलू-नताल प्रांताची राजधानी पीटरमॉरिटस्बर्ग येथील शाही वारशातील अर्ध्या हिश्शाची मागणी केली आहे. राणी सिबोंगिलच्या दोन मुली, राजकन्या एनटोम्बिझोसुथू आणि एनटांडोयेन्कोसी यादेखील त्यांच्या हिश्शासाठी इच्छापत्राच्या वैधतेवरून लढत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की हस्ताक्षराचं तज्ज्ञांनी जे विश्लेषण केलं त्यावरून इच्छापत्रावरील स्वाक्षरी बनावट असल्याचं सिद्ध होतं.
गुडविल राजाला सहा राण्या असल्या तरी त्याची तिसरी राणी शियावे मंटफोम्बी दलामिनी ही त्याची आवडती राणी, पट्टराणी असल्याचं मानलं जातं. त्यामुळेच जवळपास सव्वा कोटी झुलू जनजमातीच्या लोकांची ‘संरक्षक’ म्हणून राजानं तिची नेमणूक केली होती; परंतु राजाचं निधन झाल्यानंतर राणी शियावे हिचाही तीन महिन्यांतच अचानक मृत्यू झाला; परंतु आपल्या मृत्यूपूर्वी केलेल्या इच्छापत्रात तिनंही आपला ४७ वर्षीय मुलगा मिसुजुलू जुलू याला सिंहासनावर बसवावं असं लिहून ठेवलं आहे. आवडत्या राणीचा मुलगा म्हणून मिसुजुलू हादेखील सिंहासनाचा प्रबळ दावेदार आहे; पण नुकत्याच झालेल्या न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान तो गैरहजर होता.
झुलू जनजमातीचं प्राबल्य असलेला भाग संपूर्ण दक्षिण आफ्रिकेतील लोकसंख्येच्या तुलनेत तब्बल पाचवा भाग इतका मोठा आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत या जमातीचाही बराच वरचष्मा आहे. या प्रकरणाचं आता काय होतं, कोण ‘राजा’ बनतो, कोणाला राजघराण्याचा उत्तराधिकारी केलं जातं आणि कोणाला त्यापासून बेदखल केलं जातं, कोणत्या राणीचं लग्न वैध होतं, इतर राण्यांचं लग्न बेकायदेशीर मानलं जाईल का, सत्ता नेमकी कोणाला मिळेल, या साऱ्या बाबतीत दक्षिण आफ्रिकन लोकांमध्येही मोठी उत्सुकता आहे.
मी ‘पहिली’ राणी, सत्ता माझीच!
गुडविल राजाची पहिली पत्नी सिबोंगिल दलामिनी हिनेही न्यायालयीन लढाईवर अधिक जोर दिला आहे. न्यायालयात तिनं सांगितलं, राजानं माझ्याबरोबर पहिला विवाह केला असल्यानं त्याच्या सगळ्या संपत्तीची आणि सिंहासनाची मीच एकमेव वारसदार आहे. ज्या राणीनं आपलाच विवाह वैध असल्याचा दावा केला आहे, त्यासंदर्भात बोलताना सिबोंगिलनं न्यायालयाला विचारलं आहे, सामाजिक रीतीरिवाजानुसार केलेला विवाह माझे सत्तेचे दरवाजे बंद कसे करू शकतो?