विजेचा धक्का केसही वाकडे करू शकणार नाही; संशोधनात सापडली महत्वाची ट्रिक...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 11:15 AM2024-02-19T11:15:26+5:302024-02-19T11:15:42+5:30
अंगावर वीज पडली तरी शॉक लागणार नाही असे संशोधनातून समोर आले आहे.
अवकाळी पाऊस असो की पावसाळ्यातला, वीज पडून अनेकांचे मृत्यू झाल्याचे आपण पाहतो. परंतु अंगावर वीज पडली तरी शॉक लागणार नाही असे संशोधनातून समोर आले आहे. विजांचा कडकडाट होत असेल तर डोके भिजविल्यास विजेचा धक्का बसणार नाही असे संशोधकांना आढळून आले आहे.
वीज पडत असेल तर डोके पावसाच्या पाण्यात बुडवावे लागणार आहे. यामुळे वीज पडली तर जगण्याचे चान्सेस ९० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात, असा दावा संशोधकांचा आहे.
वीज जेव्हा पडते तेव्हा तिच्याच २०० किलोएम्पिअर एवढ्या प्रचंड विद्युतभाराची असते. एवढा मोठा शॉक बसला तर जनावरे, माणूस जागेवरच गतप्राण होतो. जर्मनीतील इल्मेनाऊ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे अभियंता रेने मॅच्स यांच्या नेतृत्वाखालील टीमने हे संशोधन केले आहे. पावसाने भिजलेली त्वचा कोरड्या त्वचेपेक्षा विजेपासून चांगले संरक्षण देते असे संशोधनात आढळल्याचे त्य़ांचे म्हणणे आहे.
यासाठी त्यांनी दोन कृत्रिम मानवी डोके तयार केली होती. सीटी स्कॅन डेटावर आधारित हे सिंथेटिक हेड काळजीपूर्वक डिझाइन केले होते. एक डोके कोरडे ठेवले, तर दुसऱ्याची त्वचा ओली करण्यासाठी कृत्रिम पावसाचे पाणी फवारले गेले. पल्स जनरेटरमधून जास्तीत जास्त विद्युत प्रवाह दोन्ही डोक्यांमधून प्रवाहित करण्यात आला. ओल्या डोक्याला कोरड्या डोक्यापेक्षा कमी जखमा झाल्याचे आढळले.