पाकिस्तानमध्ये मोठा आत्मघातकी बॉम्ब हल्ला, पाच चिनी इंजिनियर्ससह एकूण सहा जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 04:39 PM2024-03-26T16:39:39+5:302024-03-26T16:40:43+5:30
चिनी नागरिकांच्या वाहनांना लक्ष्य करून हा आत्मघाती हल्ला करण्यात आल्याची माहिती
Pakistan Blast Chinese Killed: पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे मंगळवारी एक मोठा आत्मघातकी हल्ला झाला. शांगला जिल्ह्यात या हल्ल्यात पाच चिनी नागरिकांसह सहा जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चिनी नागरिकांच्या वाहनांना लक्ष्य करून हा आत्मघाती हल्ला करण्यात आला. हा आत्मघातकी हल्ला अशा वेळी झाला, जेव्हा काही तासांपूर्वी बलुचिस्तान प्रांतातील पाकिस्तानच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नौदल तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये एका जवानाचा मृत्यू झाला. सुरक्षा दलांनी ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला.
मिळालेल्या माहितीनुसार, खैबर पख्तूनख्वामधील शांगलाच्या बिशाम तहसीलमध्ये स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने दुसऱ्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर मोठा स्फोट झाला. या घटनेच्या समोर आलेल्या छायाचित्रात स्फोटानंतर एक वाहन खड्ड्यात पडताना दिसले. स्फोटामुळे आग लागली. ज्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले, त्यात अनेक चिनी नागरिक प्रवास करत होते, त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी आणखी एका नागरिकाचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांत पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर हल्ले वाढले आहेत. आतापर्यंत डझनाहून अधिक हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेक चिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक हल्ले खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान भागात झाले आहेत. नुकत्याच झालेल्या हल्ल्यावर चीनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आतापर्यंत कोणीही हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.
दुसरीकडे, बलुचिस्तानमधील हल्ल्याबद्दल बोलायचे झाल्यास, या वर्षातील हा तिसरा मोठा हल्ला होता. या हल्ल्याची जबाबदारी बीएलएने घेतली आहे. यापूर्वीचे दोन्ही हल्लेही सुरक्षा दलांनी हाणून पाडले होते. वर्षाच्या सुरुवातीला माच शहरात सुरक्षा दलांवर हल्ला झाला होता ज्यात १० लोक मारले गेले. हल्लेखोरांनी कारागृहात घुसण्याचा प्रयत्न केला होता, तो सुरक्षा दलांनी हाणून पाडला.