पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आण्विक संयंत्राजवळ जोरदार स्फोट, डेरा गाझी खान परिसरा हादरला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 06:54 PM2023-10-06T18:54:09+5:302023-10-06T18:54:42+5:30
Pakistan News: पाकिस्तानमधील डेरा गाझी खान परिसरामध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला आहे. हा स्फोट पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आण्विक संयंत्राजवळ झाला आहे. ड्रोन हल्ल्याद्वारे हा स्फोट घडवून आणला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
पाकिस्तानमधील डेरा गाझी खान परिसरामध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला आहे. हा स्फोटपाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आण्विक संयंत्राजवळ झाला आहे. ड्रोन हल्ल्याद्वारे हा स्फोट घडवून आणला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच सुरक्षा दल अॅम्ब्यलन्स आणि अग्निशमन दलाची वाहनं घटनास्थळाकडे पाठवण्यात आली आहेत. तालिबानने आण्विक संयंत्रांवर हल्ला करण्याच्या अनेक धमक्या दिल्या आहेत. जिथे हा स्फोट झाला आहे, तिथे युरेनियमचा प्लँटही लावण्यात आलेला आहे. त्यामुळेच पाकिस्तानचं लष्कर संपूर्ण परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवते.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या दक्षिण भागामध्ये असलेल्या डेरा गाझी खान जिल्ह्यामध्ये हा स्फोट झाला आहे. तिथेच पाकिस्तानचं आण्विक संयंत्र आहे. पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या स्फोटाचा आवाज घटनास्थळावरून अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला होता. मात्र सध्यातरी या स्फोटामागचं कारण समजू शकलेलं नाही. मात्र तहरिक ए तालिबान च्या दहशतवाद्यांनी सातत्याने आण्विक ठिकाणांना उडवून देण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानने डेरा गाझी खान येथे युरेनियम ठेवण्यासाठीचं भंडारही आहेत. तसेच डेरा गाझी खान येथील आण्विक संयंत्र हे पाकिस्तानमधील सर्वात उंच संयंत्र आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत ज्यामध्ये डेरा गाझी खान परिसरात जिथे स्फोट झाला तिथे सुरक्षा दलाच्या गाड्या गडबडीने जाताना दिसत आहेत. त्याबरोबरच अग्निशमन दलाच्या गाड्याही जाताना दिसत आहेत.
दरम्यान, स्फोट झालेल्या परिसरातील लोकांना झटपट रस्ते रिकामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. व्हायरल व्हिडीओमध्येही लोक पळताना दिसत आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तान सरकारकडून याबाबत अद्याप कुठलंही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे याबाबत कुठलाही अधिकृत दुजोरा देणं कठीण बनलेलं आहे.