अभिमानाचा, आनंदाचा क्षण! सोशल मीडियासह सर्व जगभरात चंद्रयान मोहिमेच्या यशाचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 07:39 AM2023-08-24T07:39:34+5:302023-08-24T07:40:29+5:30
कोट्यवधी भारतीयांसह संपूर्ण जगातून कौतुकाचा वर्षाव, सेलिब्रेशन अन् अभिनंदन
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ‘थ्री... टू... वन... आणि फायनली चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झाले’, हे वाक्य कानी पडताच कोट्यवधी भारतीयांनी जल्लोष केला. सोशल मीडियावरून एकमेकांना शुभेच्छा, अभिनंदनाच्या संदेशांची देवाण-घेवाण होऊ लागली. शाळा, कॉलेज, कार्यालये, लोकलमध्ये, फलाटांवर प्रत्येकाने या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होण्याचा मान मिळविला. चंद्रयान चंद्राला भेटल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तरळत होते. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही जल्लोष केला.
इस्रोच्या चंद्रयान-३ मोहिमेकडे अवघ्या जगाचे लक्ष वेधले होते. बुधवारी सकाळपासूनच प्रत्येकाच्या गप्पांचा विषय चंद्रयानचे चंद्रावरील अवतरण हाच होता. सायंकाळी तो क्षण येताच सर्वांच्याच हृदयाचे ठोके जलद आणि अखेरीस चंद्रयान चांद्रभूमीवर सुखरूप उतरताच सर्वत्र जल्लोष झाला. शाळा, कॉलेज, ऑफिसांमध्ये जमलेल्या प्रत्येकाने टाळ्यांचा कडकडाट केला. मिठाईचे वाटप झाले. इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, थ्रेड आणि ट्विटरवर ही मोहीम ट्रेंडिंगमध्ये होती. शिवाय, व्हाॅट्सॲपवरही या मोहिमेला शुभेच्छा देणारे फोटो, व्हिडीओ सामान्यांनी ठेवले होते; अनेकांनी सोशल मीडियावरही या मोहिमेबद्दल भरभरून लिहिले.
लँडर चंद्रावर उतरला अन् आनंद गगनाला भिडला! वरळीतल्या नेहरू विज्ञान केंद्रात जल्लोष
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चंद्रयान ३ मोहिमेतील लँडर चंद्रावर यशस्वीरीत्या उतरला आणि भारत माता की जय, हिंदुस्थान झिंदाबाद, वंदे मातरम् आणि गणपती बाप्पा मोरया; या घोषणांनी वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्राचे सभागृह दणाणून गेले. मुंबईकरांनी शिट्ट्या, टाळ्या वाजवित केंद्राचा परिसर दणाणून सोडतानाच विद्यार्थ्यांना लँडरचे लँडिंग लाइव्ह पाहता आल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
चंद्रयान ३ चे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी नेहरू विज्ञान केंद्रात गर्दी होऊ लागली. बच्चे कंपनीसह वरिष्ठ नागरिकही कुटुंबासह मित्रांसोबत सभागृहात आले होते.
सभागृहात झालेली गर्दी पाहता सभागृहाबाहेरही थेट प्रक्षेपण दाखविले जात होते. लँडर लँड होण्यापूर्वी शास्त्रज्ञांनी उपस्थितांच्या प्रश्नांना
उत्तरे दिली.
चंद्रावरचे पाणी, माती पृथ्वीवर आणता येईल? कुतूहलमिश्रित प्रश्न व शास्त्रज्ञांची उत्तरे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: चंद्रावरच्या मातीत पाणी किती खोलवर आहे, माती कशी आहे, कोणती खनिजे आहेत, सूर्यकिरणांचा चंद्रावरील मातीसह पाण्यावर परिणाम होतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता केवळ भारताला नाही तर संपूर्ण जगाला मिळतील. त्यामुळे भविष्यात संशोधनाला आणखी बळ येईल. शिवाय भविष्यातील मोहीम यशस्वी होण्यास आणखी मदत होईल. महत्त्वाचे म्हणजे चंद्रावरील पाणी, माती, खनिजे आता लगेच पृथ्वीवर आणणे शक्य नसले तरी भविष्यात या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील, असे म्हणत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे माजी शास्त्रज्ञ प्रो. मयंक वाहिया यांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.
चंद्रयान ३ मोहिमेच्या निमित्ताने वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रात प्रो. मयंक वाहिया यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी अक्षरश: प्रश्नांचा भडिमार केला. प्रो. वाहिया हे प्रश्नांना उत्तरे देताना म्हणाले की, चंद्रावर माती आहे. पाणी आहे. खनिजे आहेत. लँडर जिथे उतरला आहे तिकडे पर्वत आहे. आता तिकडे उतरलेला लँडर परत येणार नाही. कारण लँडर परत आणण्यास तिकडे रॉकेट नाही. मोहिमेचा उद्देश लँडर सुरक्षितरीत्या उतरविणे, रोव्हर खाली उतरविणे, प्रयोग करणे हा आहे. जगभरात अनेक मोहीम झाल्या आहेत. आता उतरलेल्या लँडरच्या मदतीने चंद्रावर पाणी किती खोलवर आहे, पाणी वाहते आहे का, गुरुत्वाकर्षण कसे आहे, वातावरण कसे आहे? अशा घटकांचा अभ्यास करता येणार आहे.
मयंक वाहिया यांनी या तीन चंद्रयान मोहिमा संपल्याचे सांगतानाच आता पुढील मोहीम हाती घेतल्या जाणार असल्याचे सांगितले. आदित्य या मोहिमेद्वारे सूर्याचाही अभ्यास केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
...तर ब्रेक लागण्याची शक्यता
चंद्रावर लँडर जिथे उतरला तिथे उणे २०३ अंश तापमान आहे. अशा वेळी एवढ्या कमी तापमानात रोव्हरचे काम ठप्प पडू शकते का? असा प्रश्न उपस्थितांपैकी एका प्रेक्षकाने विचारला असता प्रो. मयंक वाहिया म्हणाले की, एवढ्या कमी तापमानात रोव्हरचे काम ठप्प पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहिमेला ब्रेक लागू शकतो; मात्र ही शक्यता आहे.
आता पुढे काय?
लँडर उतरल्यानंतर आता पुढे काय ? हा प्रश्न उपस्थितांना पडला होता. या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी उपस्थितांनी केंद्राच्या अधिका-यांना गराडा घातला होता.
लँडर आणि कुतूहल
लँडर जस जसे चंद्राच्या जवळ येत होते तस तसे उपस्थितांमध्ये धाकधूक वाढत होती. खुर्च्यांवर बसलेल्या माना आपसूकच उंचावत होत्या. लँडरचे अंतर चंद्रापासून कमी होत असतानाच व्यासपीठाकडील स्क्रीनलगत गर्दी झाली होती.
लँडरची प्रतिकृती
अंबरनाथ येथील होली फेथ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनवून आणलेली लँडरची छोटीशी प्रतिकृती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. उपस्थितांनी लँडरच्या प्रतिकृती आणि विद्यार्थ्यांसोबत छायाचित्रे काढली.
टाळ्या आणि जयघोष
चंद्रावर लँडर यशस्वीरित्या उतरला आणि सभागृहाचा आनंद मावेनासा झाला. भारत माता की जय, वंदे मातरम, गणपती बाप्पा मोरया, अशा घोषणा देत उपस्थितांनी शिटटया आणि टाळ्यांचा कडकडाट सुरु केला.
सेल्फी आणि सेलिब्रेशन
मिशन यशस्वी झाल्यानंतर सभागृहाच्या व्यासपीठावर एकत्र आलेले विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थितांनी सभागृहात उपस्थित असलेल्या शास्त्रज्ञांबरोबर तसेच आपल्या प्रियजनांबरोबर सेल्फी घेत आपला आनंद व्यक्त केला.
जपानमध्येही चंद्रयानाच्या यशाचा उत्साही जल्लोष; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जपान दौऱ्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या आणि दिवसभराच्या घडामोडी संपत असताना भारताने चंद्रावर पाऊल ठेवले, तो क्षण जपानमधील भारतीयांसोबत आनंदाने साजरा केला. वंदे मातरम् आणि भारतमाता की जय, अशा घोषणांनी आज जपान निनादले होते. या आनंदाच्या आणि ऐतिहासिक क्षणाला संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. फडणवीस यांची जपानमध्ये पहिली बैठक इस्ट जपान रेल्वे कंपनी, जेआर इस्टचे अध्यक्ष आणि सीईओ यूजी फुकासावा यांच्यासमवेत झाली. फडणवीस म्हणाले की, जपानचे माजी पंतप्रधान शिंझो ॲबे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात बुलेट ट्रेनची पायाभरणी केली आणि भारत-जपान मैत्रीचा एक नवा अध्याय लिहिला गेला. अतिशय गतीने हे काम सुरू असून, टाइमलाइन्स पाळल्या जात आहेत. जपानचे बुलेट ट्रेनचे जाळे शिनकॅन्सेन नावाने ओळखले जाते. फडणवीस यांनी शिनकॅन्सेन नियंत्रण कक्षाला भेट दिली. जपानचे पायाभूत सुविधा, वाहतूक उपमंत्री निशिदा शोजी यांचीही फडणवीस यांनी भेट घेतली. बुलेट ट्रेनस्थानकाबाहेर होणाऱ्या विकास प्रकल्पांना जायकाच्या माध्यमातून वित्तसाहाय्य करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. जपानचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री टकागी केई तसेच जेट्रोचे अध्यक्ष नोरिहिको इशिगुरो यांची फडणवीस यांनी भेट घेतली.
पोलिसांनाही आनंद
वरळी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी देखील सभागृहात आणि सभागृहाबाहेर मिशन यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करत होते. सभागृहाबाहेर पोलीसांनी झेंडा हातात धरून मिशन यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त केला.
मुंबई पोलिसांचे खास ट्विट
चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटी ट्विट करून इस्रोला शुभेच्छा देत आहेत. मुंबई पोलिसांनी एक खास ट्विट करून इस्रोचे कौतुक केले आहे. यामध्ये चंद्राच्या प्रतिमा दाखविण्यात आल्या आहेत आणि सर्वांत अखेरीस तिरंगा दाखविण्यात आला आहे.
तिरंगा फडकला
माहीम येथील बॉम्बे स्कॉटीश स्कूलच्या वृशांक आणि श्रेया या दोन मुलांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. या दोन्ही मुलांनी तिरंगा उचांवून दाखविताच उपस्थितांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.
‘चाँद तारे तोड लाऊं...’
'चंद्रयान ३'च्या यशानंतर संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण आहे. भारतीय मनोरंजन विश्वातील तारे-तारकांनीही सोशल मीडियाद्वारे आपला आनंद व्यक्त केला आहे. यात शाहरुख खान, अक्षय कुमार, चिरंजीवी, सिद्धार्थ मल्होत्रा, आर. माधवन, विकी कौशल, अनिल कपूर, श्रद्धा कपूर, अनुपम खेर, ऋतिक रोशन, काजोल, नवाजुद्दीन सिद्दीकी, एस. एस. राजामौली, विवेक ओबरॉय, शेखर कपूर यांच्यासह बऱ्याच सेलिब्रिटीजचा समावेश आहे.
'चाँद तारे तोड लाऊं, सारी दुनिया पर मैं छाऊं...' आज भारत आणि इस्रोचा बोलबाला झाला. भारताला अभिमानास्पद क्षण देणाऱ्या सर्व वैज्ञानिक, इंजिनीअर्स आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन. चंद्रयान ३ यशस्वी झाले. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग.
- शाहरुख खान
कोट्यवधी लोक इस्रोला धन्यवाद देत आहेत. आम्हाला अभिमान वाटवा असे काम तुम्ही केले आहे. भारताने इतिहास रचत असताना पाहायला मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान मानतो. भारत चंद्रावर आहे. आम्ही चंद्रावर आहोत.
- अक्षय कुमार
अत्यंत अभिमानास्पद क्षण... हिंदुस्तान झिंदाबाद था और रहेगा. इस्रोचे अभिनंदन... चंद्रावर 'चंद्रयान ३'चे यशस्वी आणि सॉफ्ट लँडिंग. भारतीय अंतरिक्षातील शोधमोहिमेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण यश.
- सनी देओल