जगभरात सुरू झालं १ जानेवारीपासून ‘जेन बिटा’चं नवं युग! फ्रँकी बनला नव्या पिढीचं प्रतीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:09 IST2025-01-07T11:07:12+5:302025-01-07T11:09:14+5:30
साधारणपणे १९९७ ते २०१० या कालावधीत जी मुलं जन्माला आली होती, त्यांना ‘जेन झी’ असं म्हटलं जातं, तर २०१० ते २०२४ पर्यंत जी मुलं जन्माला आली, त्या पिढीला ‘जेन अल्फा’ असं म्हटलं जातं.

जगभरात सुरू झालं १ जानेवारीपासून ‘जेन बिटा’चं नवं युग! फ्रँकी बनला नव्या पिढीचं प्रतीक
येणारी प्रत्येक पिढी आपलं स्वत:चं एक वैशिष्ट्य, विशेष स्थान घेऊन येते. हेच विशेषण मग त्या पिढीला लागतं आणि त्याच नावानं मग ती पिढी ओळखली जाते. जसं की आपण आजवर मिलेनियल जनरेशन, जनरेशन झेड (जेन झी), जनरेशन अल्फा (जेन अल्फा) अशा काही पिढ्या पाहिल्या. साधारणपणे १९९७ ते २०१० या कालावधीत जी मुलं जन्माला आली होती, त्यांना ‘जेन झी’ असं म्हटलं जातं, तर २०१० ते २०२४ पर्यंत जी मुलं जन्माला आली, त्या पिढीला ‘जेन अल्फा’ असं म्हटलं जातं.
आता १ जानेवारी २०२५ पासून पुढे जी नवी पिढी जन्माला येईल, त्या पिढीला म्हटलं जाईल जनरेशन बिटा (जेन बिटा). २०२५ ते २०३९ पर्यंत या नव्या पिढीचा नवा अध्याय सुरू होईल. ही पिढी एका नव्याच वातावरणात वाढेल. तिच्या अवतीभोवतीचा परिसरही आजच्या पिढीपेक्षा बऱ्यापैकी वेगळा असेल. स्मार्टफोन, रोबोट, आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं वाढणाऱ्या या पिढीची भाषाही वेगळी, बऱ्यापैकी तांत्रिक असेल. तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं जे नवे बदल घडतील, सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात त्यामुळे ज्या घडामोडी घडतील, त्यांची ही पिढी प्रमुख साक्षीदार असेल. तंत्रज्ञान हेच या नव्या पिढीचं ब्रीदवाक्य असेल. वाचनापासून ते शिक्षणापर्यंत आणि राहणीमानापासून ते करिअरपर्यंत नवी गॅझेट्स, नवं तंत्रज्ञान, मोबाइल्स हेच या पिढीचं मुख्य साधन आणि साध्य असेल. पुस्तकांचं वाचन आजच खूप कमी झालं आहे. यापुढे प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन वाचन जवळपास बंद होईल आणि ही पिढी कदाचित केवळ मोबाइलवरच वाचन करतील. आज आपण स्टिअरिंग व्हील हातात घेऊन गाड्या चालवतो, यापुढे ड्रायव्हरलेस गाड्या हेच कदाचित भविष्य असेल. गाड्या स्वत:च आपला मार्ग शोधतील आणि प्रवाशांना, मालकाला ईप्सितस्थळी पोहोचवतील.
प्रत्यक्ष डॉक्टरांऐवजी तंत्रज्ञानच तुमची काळजी घेईल. घरातले नाेकरचाकर, विविध कार्यालये, कंपन्यांतील कर्मचारी जाऊन रोबोट्स तिथला सगळा कारभार आणि कार्यभार सांभाळताना दिसतील. तुमच्या अंगावर घातलेले कपडेच तुम्हाला सांगतील, तुम्हाला कोणता आजार झाला आहे, कोणता आजार होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल. बिटा जनरेशनमधील पिढीचा बहुतांश हिस्सा तंत्रज्ञान,
टेक्नॉलॉजीनंच व्यापलेला असेल..
तंत्रज्ञानाच्या मदतीनं या पिढीचं आयुष्य बऱ्यापैकी आरामदायी आणि सुखकर झालं असलं, होणार असलं तरीही त्यांच्या पुढ्यात समस्याही वेगळ्या असतील आणि नव्या आव्हानांना त्यांना तोंड द्यावं लागेल. तंत्रज्ञानाच्या मदतीनंच त्यांना त्यावर उत्तर शोधावं लागेल. यापुढच्या काळात पृथ्वीचं तापमान आणखी वाढणार आहे. शहरं सातत्यानं मोठीच होत जाणार आहेत. जगण्यासाठी आवश्यक असलेले नैसर्गिक स्रोत कमी कमीच होत जाणार आहे. राहायला जागा अपुरी पडणार आहे. काही ठिकाणची लोकसंख्या जास्त तर काही ठिकाणी कमी होणार आहे. बऱ्याच ठिकाणी कार्यक्षम तरुण पिढीची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे, या साऱ्या समस्यांना या पिढीला मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावं लागणार आहे. त्यासाठी त्यांना अतिव जागरूक राहावं लागणार आहे. त्यांच्यानंतर येणाऱ्या नव्या पिढीसाठीची तरतूदही त्यांनाच करून ठेवावी लागणार आहे. नव्या बदलांशी सुसंगत होताना इतरांना मदत करणंही या पिढीला शिकावं लागणार आहे. या साऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी त्यांना सातत्यानं चौकस आणि जागरुक राहावं लागणार आहे. गेल्या पिढ्यांपेक्षा या पिढ्यांची आव्हानं अधिक मोठी, अधिक व्यापक आणि अधिक तातडीची असणार आहेत.
अल्फा जनरेशन आज स्मार्टफोन, कॉम्प्युटर, रोबोट्स आणि इतर स्मार्ट डिव्हायसेसच्या मदतीनं मोठी होत आहे. या गोष्टी त्यांच्या जीवनाचा जणू अविभाज्य भाग बनू पाहात आहे. पण बिटा जनरेशनच्या दृष्टीनं कदाचित हा ‘बिता कल’ आणि तोही मागासलेला असू शकेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या गोष्टींशिवाय त्यांचं पान हलणार नाही. याच नव्या पिढीला आता ‘बिटा किड्स’ असंही संबोधलं जाईल. २०३५ पर्यंत एकूण लोकसंख्येतील या पिढीचा वाटा तब्बल १६ टक्के असेल असा अंदाज आहे.
फ्रँकी बनला नव्या भारतीय पिढीचं प्रतीक
या बिटा जनरेशनचा भारतातला पहिला प्रतिनिधी १ जानेवारी २०२५ रोजी मिझोराम येथे जन्माला आला आहे. मध्यरात्री १२ वाजून तीन सेकंदांनी आयझोल येथील सिनोड रुग्णालयात त्याचा जन्म झाला. फ्रँकी रेमरुटटदिका जेडेंग असं त्याचं नाव आहे. जन्माच्या वेळी त्याचं वजन ३.१२ किलो होतं आणि हे बाळही अतिशय सुदृढ होतं. या बाळाच्या जन्मानं भारतात एका नव्या पिढीची सुरुवात झाली आहे. भारतातल्या नव्या युगाचं तो प्रतीक मानला जात आहे. फ्रँकीला एक माेठी बहीणही आहे.