इम्रान खान यांची पंतप्रधान पदाची खुर्ची जाणार की राहणार?; ३१ मार्चला भवितव्य ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 09:25 AM2022-03-29T09:25:46+5:302022-03-29T09:26:02+5:30
इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये सुरू आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सत्ता वाचवण्यासाठी १७२ खासदारांचा पाठिंबा हवा. मात्र, त्यांच्याच पक्षातील ३९ खासदारांनी बंडाळी केली आहे. त्यामुळे इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात आले आहे. सत्तेत कायम राहण्यासाठी इम्रान खान यांना मोठे डावपेच आखावे लागणार आहेत.
इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामुळे संसदेचे कामकाज ३१ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले. ३१ मार्च रोजी दुपारी ४ वाजता या अविश्वास प्रस्तावावरील मतदान इम्रान खान सरकारचे भवितव्य ठरणार आहे.
शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्याविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव वाचून दाखवला. शुक्रवारीच पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार होता. परंतु, सभापती असद कैसर यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. इम्रान खान सरकारच्या रणनीतीचा भाग म्हणून त्यांनी काही खासदारांना आपल्या बाजूने आणावे म्हणून सभागृहाचे कामकाज तहकूब केल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, रॅलेली संबोधित करताना इम्रान खान म्हणाले होते की, "आमच्या सरकारची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानच्या जनतेला देशाचा विकास दिसेल. आतापर्यंत इतर कोणत्याही सरकारने पाकिस्तानचा विकास केला नाही. मी २५ वर्षांपूर्वी राजकारणात फक्त एकाच गोष्टीसाठी आलो होतो, ती म्हणजे पाकिस्तानची निर्मिती ज्या दृष्टीकोनाने झाली ते पुढे नेणे. जे काम आम्ही तीन वर्षात केले, ते काम यापूर्वी कोणी केले नव्हते.'
बहुमतासाठी १७२ खासदारांची गरज-
पाकिस्तानी संसदेत एकूण ३४२ सदस्य आहेत. बहुमतासाठी १७२ सदस्यांची गरज आहे. इम्रान खान यांचा पक्ष आणि मित्र पक्षांची आघाडी यांच्याकडे १७९ सदस्यांचे पाठबळ होते. त्यातील इम्रान खान यांच्या पक्षाकडे १५५ सदस्य आहेत. ४ सहकारी दल सोबत होते. मात्र आता ४ मित्रपक्षांपैकी ३ जणांनी विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला समर्थन दिले आहे. त्यामुळे इम्रान खान यांचे सरकार अडचणीत आले आहे.