आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानचे ‘खायला नाही दाणा, अन्..’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 06:57 AM2023-09-17T06:57:47+5:302023-09-17T06:58:23+5:30
महागाई, आर्थिक तंगीतही अण्वस्त्रसाठा वाढवण्यावर भर, पाकिस्तान लष्कराच्या बेसकॅम्पवर त्यासाठी प्रक्षेपकही बसवण्यात आल्याचे उपग्रह छायाचित्रांमध्ये दिसत असल्याचे अहवालात म्हटले.
इस्लामाबाद : पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचा रोष वाढला असताना, मात्र पाकिस्तान सरकार अण्वस्त्रांचा साठा वाढवत असल्याचे फेडरेशन ऑफ अमेरिकी सायंटिस्टच्या अहवालातून उघड झाले आहे.
पाकिस्तान लष्कराच्या बेसकॅम्पवर त्यासाठी प्रक्षेपकही बसवण्यात आल्याचे उपग्रह छायाचित्रांमध्ये दिसत असल्याचे अहवालात म्हटले.
सध्या पाकिस्तान ४ नव्या प्लुटोनियम रिॲक्टरही काम करत आहे, तसेच युरेनियम आण्विक प्रकल्पाची क्षमताही वाढवली जात आहे. नव्या शस्त्रास्त्रांच्या निर्मितीसाठी अधिकाधिक कच्चा माल गोळा करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील असल्याचे अहवालात म्हटले आहे. पाककडून वर्षभरात किमान १४-२७ शस्त्रास्त्रे आणि ५-१० नवी अण्वस्त्रे तयार करण्यात येत आहेत.
पाकिस्तानात पेट्रोेल ३३१ रुपयांवर
पाकिस्तानमधील काळजीवाहू सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये भरमसाट वाढ केली आहे. त्यामुळे त्या देशात पेट्रोल प्रतिलिटर दर ३३१.३८ रुपये झाले. हायस्पीड डिझेलचे दर प्रतिलिटर ३२९.१८ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या दोन्ही इंधनाचे दर प्रतिलिटर ३३० रुपयांहून अधिक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या महिनाभरात पेट्रोल, डिझेलच्या दरात अनुक्रमे ५८.४३ रुपये, ५५.८३ रुपये इतकी वाढ झाली आहे.
१७० अण्वस्त्रे
पाकिस्तानच्या ताफ्यात सध्या १७० अण्वस्त्रे असून २०२५ पर्यंत ही संख्या २०० पर्यंत पोहोचण्याची शक्यता अमेरिकन आण्विक वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
कुठे ठेवतात अण्वस्त्रे ?
पाकिस्तानने त्यांच्या लष्करी आणि हवाईदलाच्या किमान ५ तळांवर अण्वस्त्रे ठेवण्याची व्यवस्था केली आहे. कराचीच्या मसरूर एअरबेसवरही अनेक अण्वस्त्रे ठेवली आहेत. त्याशिवाय मिन्हास कामरा, शहबाज एअरबेसवरही शस्त्रसाठा ठेवला आहे.